scorecardresearch

“आम्हाला ओरडावं लागतंय”; व्हर्चुअल सुनावणीदरम्यान वकील फोन वापरत असल्यानं सुप्रीम कोर्टानं व्यक्त केली नाराजी

सुनावणीदरम्यान वकील फोन वापरत असल्यानं सर्वोच्च न्यायालयानं नाराजी व्यक्त केली आहे.

Supreme Court About agricultural laws
(संग्रहित छायाचित्र)

“आम्हाला ओरडावं लागतंय”; व्हर्चुअल सुनावणीदरम्यान वकील फोन वापरत असल्यानं सुप्रीम कोर्टानं व्यक्त केली नाराजी

देशात करोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयातही करोनाचा शिरकाव झाला. सर्वोच्च न्यायालयातील चार न्यायाधीश करोना पॉझिटीव्ह आढळले होते. तर रजिस्ट्री विभागातील सुमारे १५० कर्मचारी देखील पॉझिटिव्ह आढळले होते. त्यानंतर सीजेआय एनव्ही रमणा यांनी खटल्यांच्या प्रत्यक्ष सुनावणीवर बंदी घातली होती. सुप्रीम कोर्टातील खटल्यांची सुनावणी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे होईल, असं त्यांनी सांगितलं होतं. त्यानुसार सर्वजण घरी असलेल्या कार्यालयातून काम करत आहेत. अशातच सुनावणीदरम्यान वकील फोन वापरत असल्यानं सर्वोच्च न्यायालयानं नाराजी व्यक्त केली आहे.

भारताचे सरन्यायाधीश एन व्ही रमणा यांच्या नेतृत्वाखालील सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने सोमवारी अनेक वकिलांनी मोबाईल फोन वापरल्यामुळे डिजिटल सुनावणी दरम्यान वारंवार व्यत्यय आल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. तसेच वकिलांना मोबाईलद्वारे सुनावणीस उपस्थित राहण्यास बंदी घालावी लागू शकते, असं मत देखील व्यक्त केलं.

एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, मुख्य न्यायमूर्ती एनव्ही रमणा, न्यायमूर्ती एएस बोपण्णा आणि न्यायमूर्ती हिमा कोहली यांच्या खंडपीठाने सोमवारी नाराजी व्यक्त केली. याचं कारण म्हणजे या खंडपीठानं सूचीबद्ध केलेल्या १० प्रकरणांची सुनावणी ऑडिओ किंवा व्हिडीओत वकिलांच्या बाजूने सतत येणाऱ्या अडचणींमुळे पुढे ढकलावी लागली.

खंडपीठाने एका प्रकरणात म्हटलं की “वकील मोबाइल फोन वापरताना दिसत आहेत आणि ते स्क्रीनवर दिसत नाहीत. त्यामुळे मोबाईलच्या वापरावर बंदी घालावी लागेल. वकील साहेब, तुम्ही आता सर्वोच्च न्यायालयात प्रॅक्टिस करत आहात आणि नियमित हजर राहता. वाद घालण्यासाठी तुम्ही डेस्कटॉप (संगणक) ठेवू शकत नाही का?”

दुसर्‍या एका प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान खंडपीठाने वकिलाच्या सदोष इंटरनेट कनेक्शनची दखल घेतली आणि सांगितले की, “आमच्याकडे अशा प्रकरणांची सुनावणी करण्याची शक्ती नाही. कृपया एक प्रणाली स्थापित करा जेणेकरून आम्ही तुमचे ऐकू शकू. अशीच दहा प्रकरणांवरची सुनावणी संपली आहे आणि आम्ही ओरडत आहोत. पण तुम्हाला ऐकू येत नाही.”

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: We are shouting supreme court on disruptions during online hearings hrc

ताज्या बातम्या