Shehbaz Sharif : पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी द्विपक्षीय बैठक केली. ही बैठक शांघाय सहकार्य संघटनेच्या शिखर परिषदेनंतर बीजिंगमध्ये पार पडल्याची माहिती सांगण्यात आली आहे. मात्र, यावेळी शाहबाज शरीफ यांनी व्लादिमीर पुतिन यांच्याशी चर्चा करताना भारताचा उल्लेख केल्याचं पाहायला मिळालं.
या भेटीत शाहबाज शरीफ यांनी पुतिन यांच्यासमोर रशिया आणि भारताच्या मैत्रीचा उल्लेख केला. तसेच रशियाने पाकिस्तानबरोबर देखील द्विपक्षीय संबंध मजबूत करण्याची विनंती शाहबाज शरीफ यांनी पुतिन यांच्याकडे केली. दरम्यान, शाहबाज शरीफ आणि पुतिन यांच्या या भेटीदरम्यान झालेल्या संवादाचा व्हिडीओ आता समोर आला आहे. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.
शाहबाज शरीफ यांनी म्हटलं की, “इस्लामाबाद मॉस्कोशी मजबूत संबंध निर्माण करू इच्छित आहे. आम्हाला रशियाबरोबर खूप मजबूत संबंध निर्माण करायचे आहेत. जे या प्रदेशाच्या प्रगती आणि समृद्धीसाठी पूरक असतील”, असं म्हणत शाहबाज शरीफ यांनी पुतिन यांचं अत्यंत गतिमान नेते म्हणत कौतुक केलं. तसेच त्यांच्यासोबत काम करण्याची तयारी दर्शविली.दरम्यान, शाहबाज शरीफ यांच्या विनंतीनंतर रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी म्हटलं की, “रशिया पाकिस्तानबरोबरच्या संबंधांना महत्त्व देतो आणि ते मजबूत करण्यासाठी एकत्र काम करत राहील.”
पाकिस्तानचे पंतप्रधान सोशल मीडियावर ट्रोल!
शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन अर्थात SCO च्या बैठकीतले अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत. काही तर खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही त्यांच्या एक्स अकाऊंटवर शेअर केले आहेत. त्यात मोदी पुतीन यांची गळाभेट घेताना दिसत आहेत. शिवाय, चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी हस्तांदोलन करताना दिसत आहेत. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ फक्त व्हायरलच होत नसून पाकिस्तानमधील नागरिक या व्हिडीओवरून त्यांचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांना ट्रोल करत आहेत.
व्हिडीओमध्ये काय आहे?
या व्हिडीओमध्ये चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग SCO परिषदेचे यजमान म्हणून पाहुणे व्लादिमीर पुतिन यांची इतर राष्ट्रप्रमुखांशी आणि मान्यवरांशी ओळख करून देताना दिसत आहेत. या रांगेतच पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफदेखील उभे असल्याचं दिसत आहे. शी जिनपिंग यांनी शरीफ यांच्याआधी उभ्या असलेल्या काही व्यक्तींशी पुतिन यांची ओळख करून दिली. पण शाहबाज शरीफ यांच्यासमोर येताच अभिवादन आटोपतं घेऊन जिनपिंग तसेच पुढे चालत निघाले. एवढंच नव्हे, तर शरीफ अभिवादन करण्यासाठी पुढे येत असल्याचं पाहून जिनपिंग यांनी समोर तोंड करून चालत निघणं पसंत केल्याचं व्हायरल व्हिडीओमध्ये दिसत आहे.