Pakistan-US Growing Friendship And Its Reasons: भारत रशियाकडून तेल खरेदी करत असल्यामुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर ५० टक्के टॅरिफ लादले आहे. याचबरोबर भारत आपली कृषी आणि दुग्धजन्य पदार्थांची बाजारपेठ अमेरिकेसाठी खुली करण्यात नकार देत आहे. त्यामुळे दोन्ही देशांतील व्यापार संबंध ताणले गेले आहेत. अशा परिस्थितीत अमेरिकेने पाकिस्तानशी जवळीक वाढवत भारताला डिवचण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
केवळ ‘व्यवहारी लाभ’
अमेरिकेने पाकिस्तानशी तेल करार केल्यानंतर पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर जूनपासून दुसऱ्यांदा अमेरिका दौऱ्यावर गेले आहेत. तेथे ते भारताविरोधात गरळ ओकत आहेत. अशात पाकिस्तानमधील अमेरिकेचे माजी राजदूत आणि आता हडसन इन्स्टिट्यूटमध्ये वरिष्ठ फेलो असलेल्या हुसेन हक्कानी यांच्यासाठी अमेरिका आणि पाकिस्तानची ही ‘मैत्री’ रहस्यमय नाही. त्यांनी या मैत्रीला केवळ ‘व्यवहारी लाभ’ असे म्हटले आहे.
त्यांना वाटत आहे की…
“डोनाल्ड ट्रम्प यांना जाहीर करण्यासाठी सतत ‘सक्सेस स्टोरीज’ हव्या असतात आणि पाकिस्तान त्या त्यांना देण्यास आनंदाने तयार आहे”, असे हुसेन हक्कानी फायनांशियल टाइम्सशी बोलताना म्हणाले.
ऑपरेशन सिंदूर दरम्यान झालेल्या रक्तरंजित संघर्षाच्या पार्श्वभूमीवर मुनीर अमेरिकेशी संवाद वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत. तज्ञांचा असा दावा की पाकिस्तान डोनाल्ड ट्रम्प यांना खूश करण्यासाठी अनेक आघाड्यांवर लवचिकता दाखवत आहे.
दुसरीकडे हुसेन हक्कानी यांना दोन्ही देशांच्या वाढत्या जवळीकते मागे एक मोठी रणनीती असल्यचे वाटत आहे.
“ट्रम्प भारतीयांना डिवचू इच्छित आहेत. त्यांना वाटत आहे की, यामुळे भारत त्यांच्याशी संवाद साधेल आणि त्यांच्या अटी मान्य करेल”, असे हुसेन हक्कानी म्हणाले.
निवडून न आलेले नेते आणि लष्करी अधिकारी…
भारत आणि अमेरिका यांच्यात सध्या व्यापार कराराच्या वाटाघाटी सुरू आहेत. ट्रम्प या करारातून जास्तीत जास्त फायदा मिळवू इच्छित आहेत आणि भारतातील कृषी आणि दुग्ध बाजारपेठेत प्रवेश करू इच्छित आहेत, या प्रस्तावाला भारत विरोध करत आहे.
“निवडून न आलेले नेते आणि लष्करी अधिकारी डोनाल्ड ट्रम्प यांच्या आत्मकेंद्रितपणाला आकर्षित करण्यासाठी अतिरेकी आश्वासने देण्यास तयार आहेत”, असे असीम मुनीर यांच्या राजवटीचे वॉशिंग्टनस्थित टीकाकार हुसेन नदीम यांचे म्हणणे आहे. याबाबत फायनान्शियल टाईम्सने दिलेल्या वृत्तात उल्लेख आहे.
अशा अपारंपरिक राष्ट्रपतींशी…
केवळ पाकिस्तानी राजनैतिक तज्ञच नाही, तर आशिया पॅसिफिक देशाच्या संबंधांचा अभ्यास करणारे अमेरिकन तज्ञांनाही येणाऱ्या दिसणाऱ्या गोष्टींपेक्षा यामागे खूप काही असे वाटत आहे.
“अमेरिका-पाकिस्तान संबंधांमध्ये जे घडत आहे ते आश्चर्यकारक आहे. मी आता या संबंधांचे वर्णन असे करेन की ते अनपेक्षित पुनरुत्थानाचा आनंद घेत आहे”, असे आशिया पॅसिफिक फाउंडेशनचे अनिवासी वरिष्ठ फेलो मायकेल कुगेलमन यांनी म्हटले आहे. “अशा अपारंपरिक राष्ट्रपतींशी कसे वागावे हे पाकिस्तानने खूप यशस्वीरित्या समजून घेतले आहे”, असे ते पुढे म्हणाले.