२०१९ लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान काँग्रेस राहुल गांधी यांनी एक वक्तव्य केलं होतं. ज्या वक्तव्यामुळे सुरत कोर्टाने राहुल गांधी यांना दोषी ठरवलं आहे. त्यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. २०१९ मध्ये लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या वेळी कर्नाटकमध्ये झालेल्या एका सभेत एक वक्तव्य केलं होतं. त्यावेळी राहुल गांधी असं म्हणाले होते की “सगळ्या चोरांचं आडनाव हे मोदी का असतं?”या वाक्यावरून भाजपाचे आमदार आणि माजी मंत्री पूर्णेश मोदी यांनी राहुल गांधींच्या विरोधात अब्रू नुकसानीचा दावा केला होता. याच प्रकरणात राहुल गांधी यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राहुल गांधी हे प्रकरण वरच्या कोर्टात घेऊन जाऊ शकतात. म्हणजेच या निर्णयाला आव्हान देऊ शकतात.

काय आहे हे संपूर्ण प्रकरण?

कर्नाटकमध्ये राहुल गांधी यांची रॅली होती. त्यावेळी नीरव मोदी, ललित मोदी, नरेंद्र मोदी यांच्या आडनावांमध्ये समान धागा काय आहे? सगळ्या चोरांचं आडनाव मोदी का? या आशयाचं एक वक्तव्य केलं होतं. हे वक्तव्यच राहुल गांधी यांना भोवलं आहे. कोर्टात राहुल गांधी यांनी केलेल्या या भाषणाचे रेकॉर्डिंग दाखवण्यात आले. या प्रकरणात राहुल गांधी यांना तीनवेळा कोर्टात उपस्थित रहावं लागलं होतं. त्यांचे व्हिडीओही या वेळी कोर्टात पुरावा म्हणून दाखवले गेले होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सुरत कोर्टात या प्रकरणाची सुनावणी सुरू असताना राहुल गांधी यांनी आपल्यावर लावण्यात आलेले आरोप फेटाळले होते. राहुल गांधी म्हणाले होते की निवडणूक प्रचारात मी काय बोललो होतो ते मला आता आठवत नाही. राहुल गांधी यांना आयपीसीच्या कलम ४९९ आणि ५०० च्या अंतर्गत दोषी ठरवण्यात आलं आहे. या प्रकरणात अपील करण्यासाठी ३० दिवसांची मुदत देण्यात आली आहे. तसंच राहुल गांधी यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. या प्रकरणात दोषी आढळणाऱ्याला दोन वर्षांचा तुरुंगवास आणि दंड अशा दोन्ही शिक्षा एकत्र केल्या जाण्याची तरतूद आहे. आता राहुल गांधी यांचं नेमकं काय होणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.