Why US Protesting Against Donald Trump: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात अमेरिकेतील विविध शहरांमध्ये निदर्शने झाली. याची सुरुवात कॅलिफोर्नियाच्या लॉस एंजेलिस शहरापासून झाली होती. आता हे आंदोलन संपूर्ण अमेरिकेत पसरले आहे. शनिवारी फिलाडेल्फियामध्ये शेकडोंच्या संख्येने निदर्शक ट्रम्प प्रशासनाच्या विरोधात रस्त्यावर उतरले. यावेळी ट्रम्प यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली.

व्हाईट हाऊसच्या इमिग्रेशन धोरणाविरोधात अमेरिकेत संतापाची लाट पसरली आहे. लॉस एंजेलिस शहरातील आंदोलन आटोक्यात आणण्यासाठी यूएस नॅशनल गार्ड तैनात केले गेले. ज्यामुळे निदर्शक आणखी संतप्त झाले असून ट्रम्प प्रशासनावर हुकूमशाही राबविल्याचा आरोप केला जात आहे.

‘नो किंग्ज’ निदर्शनांना वाढता पाठिंबा

शनिवारी सकाळपासून संपूर्ण अमेरिकेतील विविध शहरांमध्ये नो किंग्ज निदर्शनासाठी लोक एकत्र जमलेले दिसून आले. असोशिएटेड प्रेसच्या बातमीत दिलेल्या माहितीनुसार, अटलंटा शहरात जवळपास पाच हजार निदर्शकांनी एकत्र येत नो किंग्ज रॅली काढली. फिलाडेल्फियाच्या लव्ह पार्कमध्ये निदर्शक जमले तेव्हा पावसाच्या हलक्या सरी बरसल्या तरी निदर्शक मागे हटले नाहीत. “हे रस्ते कुणाचे? हे रस्ते आमचे”, अशी घोषणाबाची निदर्शक देत होते.

मिनेसोटा येथे गोळीबारानंतर निदर्शन रद्द

दरम्यान, मिनेसोटामध्ये डेमॉक्रेटिक पक्षाच्या दोन खासदारांवर गोळीबार झाल्याच्या पार्श्वभूमीवर निदर्शन रद्द करण्यात आले. गोळीबाराचा तपास करण्यात पोलीस गुंतले असल्यामुळे निदर्शकांनी आंदोलन न करण्याचा निर्णय घेतला.

अमेरिकेतील विविध शहरांमध्ये आंदोलक एकत्र आले असताना त्यांनी हातात अमेरिकेचे झेंडे आणि ट्रम्प यांच्या विरोधात घोषणा असलेले फलक मिरवले. अनेकांनी ट्रम्प यांची प्रतिकृती असलेल्या बाहुल्याही दाखविल्या. असोशिएटेड प्रेसच्या बातमीनुसार, देशभरात जवळपास २००० ठिकाणी निदर्शने करण्याचे निदर्शकांचे नियोजन आहे. शहरांमधील प्रमुख चौक, न्यायालयांचा आवार, सार्वजनिक उद्याने अशा ठिकाणांवर निदर्शन आयोजित करण्यात येत आहे. परंतु वॉशिंग्टन डिसीमध्ये लष्कराच्या वर्धापन दिनाची परेड असल्यामुळे तिथे निदर्शन करण्यात आले नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नो किंग्ज निदर्शन कशासाठी?

नो किंग्ज निदर्शनाच्या माध्यमातून डोनाल्ड ट्रम्प आणि अब्जाधीस एलॉन मस्क यांचा विरोध केला जात आहे. ट्रम्प हे लोकशाही पद्धतीने राष्ट्राध्यक्ष पदावर निवडून आले असले तरी त्यांची काम करण्याची पद्धत एखाद्या राजासारखी आहे, त्यामुळे त्यांना या पदावरून हटविण्याची मागणी नो किंग्ज निदर्शनाच्या माध्यमातून केली जात आहे.