Pakistan-Afghanistan Durand Line Conflict : पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये ११ आणि १२ ऑक्टोबर या दरम्यान अभूतपूर्व संघर्ष उफाळून आला होता. पाकिस्तानने अफगाणिस्तानमध्ये हवाई हल्ले केले आणि सीमावर्ती भागांतील चौक्यांवर हल्ला केला, तर या हल्ल्याला अफगाणिस्तानच्या सार्वभौमत्वावर हा हल्ला असल्याचं सांगत अफगाणिस्ताननेही पाकिस्तानच्या अनेक सीमावर्ती भागांवर जोरदार हल्ला केला. त्यामुळे या दोन्ही देशांतील संघर्ष वाढला. मात्र, त्यानंतर कतारमधील दोहा या ठिकाणी शांतता चर्चा पार पडली आणि पाकिस्तान-अफगाणिस्तानने तत्काळ युद्धबंदीवर सहमती दर्शवली.

पाकिस्तान-अफगाणिस्तानच्या युद्धबंदीच्या करारात कतार आणि तुर्कीने मध्यस्थी करत महत्वाची भूमिका बजावली. मात्र, यावेळी तालिबानने युद्धविरामातील एका शब्दावर तीव्र आक्षेप घेतल्याचं सांगितलं जातं. कतारच्या परराष्ट्र मंत्रालयाने एक निवेदन जाहीर केलं होतं. यामध्ये पाकिस्तान-अफगाणिस्तानने युद्धबंदीला सहमती दर्शवल्याचं म्हटलं होतं. मात्र, या निवेदनात कतारने सीमा या शब्दाचा उल्लेख केला होता. त्यामुळे या शब्दावर अफगाणिस्तानने तीव्र आक्षेप घेतला. त्यानंतर अखेर निवेदनामधील ‘सीमा’ हा शब्द वगळण्यात आला.

दरम्यान, पाकिस्तान-अफगाणिस्तानमधील संघर्षामुळे पुन्हा एकदा दोन्ही देशांमधील सीमा असलेल्या ड्युरंड रेषा चर्चेत आली आहे. त्यामुळे ही ड्युरंड रेषा नेमकं काय आहे? अफगाण लोकं ड्युरंड रेषेला सीमा मानण्यास नकार का देतात? याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेऊयात. या संदर्भातील माहिती हिंदुस्तान टाईम्सने एका वृत्तात दिली आहे.

नेमकं काय घडलं?

पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील तणावामुळे दोन्ही देशांमधील सीमा असलेल्या ड्युरंड रेषा चर्चेत आली आहे. कतारने युद्धबंदीच्या निवेदनात ड्युरंड रेषेचा उल्लेख ‘सीमा’ असा केला. मात्र, त्यामुळे अफगाणिस्तानचे अधिकारी अस्वस्थ झाले. त्यानंतर कतारने युद्धबंदीच्या निवेदनातून हा शब्द ओघळला.

ड्युरंड रेषा काय आहे?

अफगाणिस्तान व पाकिस्तान यांच्यातील ड्युरंड रेषा ही सीमा आहे. ही ड्युरंड रेषा जवळपास २,६७० किलोमीटर पेक्षा जास्त लांब असून १८९३ मध्ये ड्युरंड रेषा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रेषेच्या संदर्भातील एक करार झाला होता. ब्रिटिश सिव्हिल सेवक सर हेन्री मॉर्टिमर ड्युरंड आणि तत्कालीन अफगाण शासक अमीर अब्दुर रहमान यांच्यात हा करार करण्यात आला होता. पण पुढे १९४७ मध्ये स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ड्युरंड रेषा पाकिस्तानला मिळाली. मात्र, अफगाणिस्तानने हे मान्य करण्यास नकार दिला. त्यानंतर अफगाणिस्तानने त्या रेषेला आजपर्यंत कधीही अधिकृत आंतरराष्ट्रीय सीमा म्हणून मान्यता दिली नाही.

पाकिस्तान ड्युरंड रेषेला आंतरराष्ट्रीय सीमा म्हणून मान्यता देतो, तर अफगाणिस्तान अशा प्रकारची मान्यता देण्यास विरोध करतो. अलिकडच्या काळात सीमारेषा दोन्ही देशांमधील वादाचा मुद्दा ठरत आहे. पाकिस्तानने त्यावर कुंपण घातलं आहे तर अफगाण रक्षकांनी ते कुंपण तोडण्याचा प्रयत्न केला आहे.