Akhilesh Yadav On Aniruddhacharya : समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव आणि अनिरुद्धाचार्य यांच्यामधील संवादाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. अखिलेश यादव आणि अनिरुद्धाचार्य यांची रस्त्यावर अचानक भेट झाल्याचा हा व्हिडीओ आहे. मात्र, यावेळी दोघांमध्ये झालेल्या संवादाची सध्या मोठी चर्चा रंगली आहे. यावेळी अखिलेश यादव यांनी अनिरुद्धाचार्य यांना एक प्रश्न विचारला. मात्र, त्या प्रश्नाचं उत्तर देताना अनिरुद्धाचार्य काहीसे अडखळले. त्यामुळे सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.

नेमकं काय घडलं?

माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी अनिरुद्धाचार्य यांना विचारलं की, “यशोदा मातेने श्रीकृष्णाला पहिल्यांदा कोणत्या नावाने हाक मारली. म्हणजे श्रीकृष्णाचं पहिलं नाव काय होतं?” यावर उत्तर देताना अनिरुद्धाचार्य हे काहीसे अडखळले. त्यानंतर अनिरुद्धाचार्य यांनी म्हटलं की, “भगवान कृष्णाला अनेक नावं आहेत. यशोदा मातेने पहिल्यांदा कन्हैया म्हटलं होतं”, असं उत्तर अनिरुद्धाचार्य यांनी दिलं. मात्र, अनिरुद्धाचार्य यांना स्पष्ट उत्तर देता न आल्याने अखिलेश यादव म्हणाले की “आजपासून तुमचा मार्ग वेगळा आणि आमचा मार्ग वेगळा.”

अनिरुद्धाचार्य यांनी दिलेलं उत्तर ऐकल्यानंतर अखिलेश यादव म्हणाले की, “इथेच आमचा आणि तुमचा मार्ग वेगळा झाला. तुम्हाला शुभेच्छा. मात्र, आजपासून तुम्ही कोणालाही शूद्र म्हणू नका.” दरम्यान, अनिरुद्धाचार्य आणि अखिलेश यादव यांच्यामधील या संवादाचा हा व्हिडीओ आता व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ नेमकी कधीचा आहे याची माहिती समोर आलेली नाही. मात्र, पण हा व्हिडीओ जुना असल्याचंही सांगितलं जात आहे.

अनिरुद्धाचार्य यांनी काय स्पष्टीकरण दिलं?

दरम्यान, अखिलेश यादव आणि अनिरुद्धाचार्य यांच्यातील संवादानंतर अनिरुद्धाचार्य यांनी स्पष्टीकरणही दिलं आहे. अनिरुद्धाचार्य म्हणाले की, “जर एखाद्या आईने तिच्या मुलाला प्रश्न विचारला आणि मुलगा उत्तर देऊ शकला नाही, तर आई म्हणेल का की आजपासून तुझा मार्ग वेगळा आणि माझा मार्ग वेगळा? विचार करा. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री राहिलेले नेते मला सांगतात की तुझा मार्ग वेगळा आणि माझा मार्ग वेगळा. याचं कारण काय तर त्याच्या प्रश्नाचं उत्तर त्यांना हवं तसं दिलं नाही”, असं अनिरुद्धाचार्य यांनी म्हटलं आहे.

“मी म्हटलं की सत्य काय आहे? मग राजाला जर लोकांबद्दल द्वेष असेल तर तुम्ही समाजातील एकतेबाबत कसं बोलू शकता. अखिलेश यादव मला सांगतात की तुमचा मार्ग वेगळा, माझा मार्ग वेगळा, पण ते मुस्लिमांना त्यांचा मार्ग वेगळा हे सांगणार नाहीत. ते मुस्लिमांना सांगतात की तुमचा मार्ग आणि आमचा मार्ग एकसारखाच. जेव्हा राजांमध्ये असा द्वेष असेल, तेव्हा ते लोकांची सेवा कशी करतील?”, असं अनिरुद्धाचार्य यांनी म्हटलं आहे.