कोरेगाव भीमा दंगलप्रकरणी पोलिसांनी एल्गार परिषदेच्या आयोजकांवर ठपका ठेवल्यानंतर माओवाद्यांचा या प्रकरणी हात असल्याचा दावा केला. त्यानंतर काल मंगळवारी देशभरात छापे मारून नक्षलींशी संबंध असल्याचा संशय व्यक्त करत एल्गार परिषदेच्या आयोजकांना व संबंधित कार्यकर्त्यांना अटक केली. एकूण पाच जणांना पोलिसांनी अटक केली असून देशात अराजक माजवण्याचा माओवाद्यांचा प्रयत्न असल्याचे प्रतिपादन पोलिसांनी केले आहे. तसेच, शहरी भागातील नक्षलींच्या कारवाया हा त्यांच्या तपासाचा केंद्रबिंदू असल्याचेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे. यावरून #UrbanNaxal हा हॅशटॅग प्रचलित होताना दिसत आहे.

अटक झालेल्या वर्नन गोन्सालविस यांच्या पत्नी सुसान अब्राहम गोन्सालविस यांनी आमचा व भीमा कोरेगावचा काय संबंध आहे अशी विचारणा केली आहे. ज्यांना अटक करण्यात आली आहे त्यांचे पेन ड्राइव्ह सादर करण्यात आले असून याआधारे अर्बन नक्षलीझम फैलावण्यात आले, असा दावा पुणे पोलिसांनी केल्याचे सुसान म्हणाल्या. शहरी नक्षलवादाचं वर्णन असं करतात का, असा उपरोधिक सवालही त्यांनी विचारला आहे.

दरम्यान, हाच हॅशटॅग वापरून बॉलीवूडमधला दिग्दर्शक विवेक अग्नीहोत्री यानं ट्विट केलं होतं, व कोण आहेत #UrbanNaxal असा सवाल करत त्यांची यादी बनवावी असं आवाहन केलं. मात्र, हा प्रयोग त्यांच्या अंगलट येताना दिसत असून अनेकांनी मी आहे अर्बन नक्षल असं उत्तर देत, उपाहासात्मक प्रतिक्रिया दिल्या आहेत. देशाच्या आदिवासी भागांमध्ये असलेला नक्षलवाद शहरी भागांमध्ये आता पसरत असून नक्षलवादी शहरीला नैतिक पाठिंबा देण्याबरोबरच आर्थिक रसदही पुरवण्यात येत असल्याचा पोलिसांना संशय आहे. त्यामुळेच #UrbanNaxal कडे सगळ्यांचेच लक्ष केंद्रीत झाल्याचे दिसत आहे.

दरम्यान, विवेक अग्निहोत्री आपलं स्वत:चं अर्बन नक्षल या पुस्तकाचं प्रमोशन या निमित्तानं करत असल्याची टिप्पणी काही जणांनी केली आहे. तर सागरिका घोष यांनी धर्मांध चित्रपट निर्माता असं अग्निहोत्री यांचं वर्णन केलं आहे. #UrbanNaxal किंवा कथित नक्षलींवरील कारवाई वरून हिंदुत्ववादी व डावे असं युद्ध सोशल मीडियावर रंगताना बघायला मिळत आहे.