RSS 100 Years राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांचं नातं मागील तीन पिढ्यांपासून आहे. मोहन भागवत यांच्या आजोबांनी डॉ. हेडगेवारांना साथ दिली होती. त्यामुळेच भागवत यांच्या कुटुंबाचं आणि संघाचं नातं हे तीन पिढ्यांपासून आहे यात काहीच शंका नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना होऊन १०० वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्ताने आपण जाणून घेऊ भागवत यांच्या आजोबा आणि वडिलांच्या संघाबाबतच्या योगदानाबाबत.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघासाठी अनेक पिढ्यांचा संघर्ष
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नावाच्या संस्थेचा आज १०० वर्षांचा वटवृक्ष तयार झाला आहे. या संघटनेचा इतिहास फार मोठा आहे. विद्यमान सरसंघचालक मोहन भागवत यांच्या आजोबांचं आणि वडिलांच्या संघाच्या जडणघडणीत मोठं योगदान आहे. मोहन भागवत यांचे आजोबा श्रीनारायण पांडुरंग भागवत यांनी संघाचे संस्थापक केशव बळीराम हेडगेवार यांना संघाच्या स्थापनेसाठी मोलाची मदत केली. तर मोहन भागवत यांचे वडील मधुकर भागवत यांनी लाल कृ्ष्ण आडवाणी ते नरेंद्र मोदी यांच्यासारख्या नेत्यांना राजकारण आणि संघाचे संस्कार दिले. श्रीनारायण पांडुरंग यांना नानासाहेब भागवत असंही संबोधलं जात असे. मोहन भागवत यांना संघाच्या संस्कारांचं बाळकडू घरातूनच मिळालं आहे.
डॉ. हेडगेवार यांच्या साथीला होते नानासाहेब भागवत
नानासाहेब भागवत यांचा जन्म महाराष्ट्रातल्या चंद्रपूरमध्ये १८८४ मध्ये झाला. घरातली आर्थिक स्थिती चांगली नव्हती. त्यामुळे ते त्यांच्या मामाकडे म्हणजेच नागपूर जिल्ह्यातील काटोल या ठिकाणी आहे. नानासाहेब भागवत यांनी त्यावेळी अलहाबाद येथून कायद्याची पदवी घेतली. त्यानंतर चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा नगरपालिकेचं काम पाहण्यास सुरुवात केली होती. वरोरा हे कोळशाच्या खाणींसाठी प्रसिद्ध होतं. नानासाहेब भागवत यांनी चंद्रपूर जिल्हा न्यायालयात वकिलीही सुरु केली. त्यावेळी वरोरा हे काँग्रेसच्या घडामोडींचं केंद्र ठरलं होतं. नानासाहेब भागवत हे काँग्रेसशी जोडले गेले होते. तिथे लोकमान्य टिळक यांचे निकटवर्तीय बळवंत राव यांच्याशी नानासाहेब यांची ओळख झाली. देश, समाज, संस्कृती याबाबत लोकमान्य टिळकांचे जे विचार होते ते नानासाहेबांना भावले होते. हळूहळू नानासाहेब भागवत यांची गणना दिग्गज वकिलांमध्ये होऊ लागली. डॉ. हेडगेवार यांनी जेव्हा संघाची शाखा चंद्रपूरमध्ये सुरु केली तेव्हा त्यांच्या विचारांची प्रेरणात घेत नानासाहेब भागवत यांनी संघात येणं पसंत केलं. हेडगेवार हे त्यांच्यापेक्षा वयाने पाच वर्षांनी लहान होते. नानासाहेब भागवत हे अशा काळात संघाशी जोडले गेले ज्या काळात संघाकडे कार्यालयही नव्हतं. तसंच फार स्वयंसेवकही नव्हते. नानासाहेब भागवत यांनी चंद्रपूर येथील त्यांचं घर संघाच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीसाठी दिलं. स्वयंसेवकांची राहण्याची व्यवस्था, जेवणाची व्यवस्थाही नानासाहेब करत असत. नानासाहेब भागवत यांना लहान मुलं प्रिय होती त्यांच्यावर ते संघाचे संस्कार करत असत. त्यांच्या या संस्काराचा परिणाम त्यांच्या कुटुंबावरही झाला. नानासाहेब भागवत यांचे पुत्र मधुकर भागवत हे प्रचारक झाले आणि त्यांनी संघाचा प्रचार करण्यासाठी घर सोडलं. आज तकने हे वृत्त दिलं आहे.
मधुकर भागवत यांनी गुजरातमध्ये संंघाचं काम केलं
मधुकर भागवत हे सरसंघचालक मोहन भागवत यांचे वडील. त्यांना प्रचारक म्हणून गुजरातमध्ये पाठवण्यात आलं. गुजरातमध्ये संघाचं काम उभं करणं, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मोठा करण्यात हातभार लावणं यासाठी नानासाहेब भागवत यांनी मोलाचं योगदान दिलं. तसंच लालकृष्ण आडवाणी आणि नरेंद्र मोदी यांच्या आयुष्यांवर मधुकर भागवत यांचा प्रभाव होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचं पुस्तक ज्योतिपुंज यात २० व्या वर्षी ते मधुकर भागवत यांना कसे भेटले होते तो प्रसंग लिहिला आहे. मधुकर भागवत यांनी १९४१ ते १९४८ या कालावधीत गुजरातच्या ११५ गावांमध्ये आणि शहरांमध्ये संघाची स्थापना केली. १९८४ मध्ये नागपूरहून आडवाणी जेव्हा प्रचारासाठी निघाले होते तेव्हा त्यांनी वेळात वेळ काढत मधुकर भागवत यांची भेट घेतली होती. मधुकर भागवत यांनी त्यांचे पुत्र आणि विद्यमान सरसंघचालक मोहन भागवत यांच्यावरही तेच संस्कार घडवले. मोहन भागवत आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक आहेत त्यामागे असा तीन पिढ्यांचा इतिहास आहे.