Air India Plane Crash Ahmedabad : अहमदाबादमध्ये १२ जून रोजी एअर इंडियाच्या एका विमानाला अपघात झाल्याची घटना घडली. या घटनेत तब्बल २७५ जणांचा मृत्यू झाला आहे. एअर इंडियाचं हे विमान अहमदाबादवरून लंडनकडे निघालं होतं. पण अहमदाबाद विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर एअर इंडियाचं बोईंग ७८७ ड्रीमलायनर हे विमान काही वेळातच एका वसतिगृहावर कोसळलं आणि त्यानंतर या विमानाचा स्फोट झाला. या संपूर्ण घटनेनंतर देशभरात हळहळ केली जात आहे.
एअर इंडियाच्या या विमानाचा अपघात नेमकं कसा झाला? या विमानात काही तांत्रिक अडचणी होत्या का? याचा तपास आता सुरु आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत या संदर्भातील माहिती समोर येईल. मात्र, विमानाचा अपघात होण्याआधी नेमकं काय झालं होतं? आणि विमानाच्या पायलटने एटीसीला शेवटचा संदेश काय पाठवला होता? याची माहिती आता समोर आली आहे.
दरम्यान, या विमानातील पायलट सुमित सभरवाल यांनी एअर ट्रॅफिक कंट्रोलरला (एटीसी) ५ सेकंदांचा एक महत्वाचा संदेश पाठवला होता.”Thrust Not Achieved, Falling, Mayday! Mayday! Mayday!”, अशा प्रकारचा संदेश पायलट सुमित सभरवाल यांनी पाठवला होता, म्हणजे विमानाला थ्रस्ट मिळत नाही, विमानाचा पावर कमी होत आहे, विमान कोसळत आहे, असं सुमित सभरवाल यांनी एटीसीला संपर्क साधत म्हटलं होतं. मात्र, त्यानंतर एटीसीकडून पायलट सुमित सभरवाल यांना पुन्हा रिप्लाय जाईपर्यंत विमान कोसळलं होतं. या संदर्भातील वृत्त इकोनॉमिक टाइम्सने दिलं आहे.
‘ब्लॅक बॉक्स’मधून विमान कोसळण्यामागचं गूढ उकलणार?
एअर इंडियाच्या या विमानाच्या अपघाताची चौकशी सुरु करण्यात आलेली आहे. तसेच तपास यंत्रणांच्या पथकाला दुर्घटनाग्रस्त विमानाचा ‘ब्लॅक बॉक्स’ सापडला आहे. त्यामुळे या ‘ब्लॅक बॉक्स’मधून विमान कोसळण्यामागचं गूढ उकलणार आहे. विमान अपघातानंतर त्यातील महत्वाच्या गोष्टी ‘ब्लॅक बॉक्स’मध्ये असतात.
अहमदाबाद विमान दुर्घटनेनंतर डीजीसीएचा मोठा निर्णय
अहमदाबाद विमान दुर्घटनेनंतर डीजीसीएने महत्वाचे आदेश दिले आहेत. आदेशानुसार आता बोईंग ७८७ ड्रीमलायनर या विमानांची उड्डाणापूर्वी संपूर्ण सुरक्षा तपासणी अनिवार्य करण्यात आल्याची माहिती सांगण्यात आली आहे. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) दिलेल्या या आदेशानंतर बोईंग ७८७ विमानांच्या अनिवार्य सुरक्षा तपासणी सुरु करण्यात आल्याचं एअर इंडियाने म्हटलं आहे. तसेच डीजीसीएने निर्देशित केलेल्या सुरक्षा तपासणी पूर्ण करण्याच्या प्रक्रियेत एअरलाईन्स असून पुढील ऑपरेशन्ससाठी परवानगी देण्यापूर्वी बोईंग ७८७ विमानांची ही तपासणी केली जात असल्याचं एअर इंडियाने म्हटलं आहे.