जगभरात मेसेजिंगसाठी मोठ्या प्रमाणावर वापरण्यात येणाऱ्या Whatsapp मध्ये आज दुपारी अचानक तांत्रिक बिघाड झाला होता. साधारण मागील दोन तासांपासून व्हॉट्सअ‍ॅपची सेवा बंद होती. दरम्यान, ऑनलाईन संवादाचे एक प्रभावी माध्यमच बंद पडल्यामुळे वापरकर्त्यांनी त्रागा व्यक्त केला. सर्व्हर डाऊन झाल्यामुळे व्हॉट्सअ‍ॅप बंद झाले होते, असे सांगण्यात येत आहे. मात्र हा सायबर हल्ला असू शकतो, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. याबाबत सायबर तज्ज्ञ प्रशांत माळी यांनी अधिक माहिती दिली आहे. ते ‘एबीपी माझा’शी बोलत होते.

हेही वाचा >>> WhatsApp डाऊन झाल्यानंतर कंपनी म्हणते, “आम्हाला माहितीये..”; दीड तासाने आली पहिली प्रतिक्रिया!

व्हॉट्सअ‍ॅपचं सर्व्हर डाऊन झाले होते. मात्र मागील दोन तासांपासून व्हॉट्सअ‍ॅप बंद होते. मला असे वाटते की व्हॉट्सअ‍ॅपकडून तांत्रिक बिघाडाचे कारण दिले जाऊ शकत नाही. या अडचणीवर मात करण्यात व्हॉट्सअ‍ॅप पूर्णपणे अपयशी ठरलेले आहे. हा सायबर हल्लादेखील असू शकतो. जेव्हा व्हॉट्सअ‍ॅपचा वापर वाढतो, तेव्हा अशा प्रकारचे सायबर हल्ले होऊ शकतात. या माध्यमाचा वापर पैसे पाठवण्यासाठी, संवाद साधण्यासाठी होतो. सध्यातरी लोकांना मानसिक त्रास होत आहे. मात्र अशीच स्थिती राहिली तर मोठा आर्थिक फटका बसू शकतो, असे प्रशांत माळी यांनी सांगितले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नेमकं घडलं काय होतं?

दुपारी १२ वाजून ७ मिनिटांनी युजर्सला अडचणी यायला सुरुवात झाल्याची नोंद डाऊन डिटेक्टरने केली होती. त्यानंतर ही संख्या वाढत जाऊन साधारणपणे एक वाजेपर्यंत व्हॉट्सअ‍ॅपवर मेसेज पाठवण्यात अडचणी येत असल्याच्या हजारो तक्रारी समोर आल्या. यातील बहुतेक तक्रारी या मेसेज पाठवता येत नसल्याच्या होत्या. तर इतर तक्रारींमध्ये सर्व्हर डिस्कनेक्शन आणि मोबाईल अॅप क्रॅश होणे अशा तक्रारींचा समावेश होता. ही अडचण साधारण तोन तास होती. नंतर व्हॉट्सअ‍ॅपची मालकी असलेल्या मेटा कंपनीने या तांत्रिक बिघाडावर स्पष्टीकरण दिले.