पक्षसंघटना तसेच मुख्यमंत्रीपद यामध्ये महिलांना ५० टक्के पदे दिली जावीत, अशी घोषणा राहुल गांधी यांनी केल्याने राज्य काँग्रेसमधील महिला नेत्यांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. राहुल गांधींच्या या धोरणामुळे राज्य काँग्रेसमध्ये ‘महिलाराज’ येण्याची शक्यता आहे. प्रत्येक राज्यातील नेत्यांशी राहुल गांधी यांनी १५ ते ३० मिनिटे चर्चा केली असून निवडणुकीत कोणाला उमेदवारी द्यावयाची याची प्रक्रिया पक्षाने सुरू केली आहे. त्यासाठी नव्याने स्थापन करण्यात आलेल्या छाननी समितीच्या बैठका घेण्यात आल्या असून पक्षाचे उमेदवार लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत.
‘सत्ता हे विषच आहे. मात्र, जबाबदारीपासून पळणेही योग्य नाही. त्यामुळे पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारण्यास तयार आहे’, असे स्पष्ट करत काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधानपदाच्या बोहल्यावर चढण्यास आपण तयार असल्याचे संकेत दिले होते.
काँग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनातही राहुल गांधींच्या पंतप्रधानपदासाठी उमेदवारी जाहीर करण्याबाबत नारेबाजीने जोर धरला होता. कार्यकर्ते अनावर होत असल्याचे पाहून खुद्द राहुल गांधींनी शांत व्हा! तुमच्या मनात जे आहे, त्यावर मी बोलेन असे म्हणत अधिवेशन चालू ठेवण्याची विनंती केली. त्यानंतर आपल्या भाषणात विरोधकांचा समाचार घेत देशात सध्या काही विरोधक केवळ चमकोगिरी करण्यात पटाईत आहेत. केस गळालेल्या माणसाला कंगवा विकण्याची यांची प्रवृत्ती आहे. असे म्हणत भाजपवर निशाणा साधला.
तसेच हुकूमशाही वृत्ती असलेल्या व्यक्तीकडून लोकशाहीचे संवर्धन होणार नाही, समाजात फूट पाडणाऱ्यांना देश कदापि स्वीकारणार नाही असेही राहुल गांधी म्हणाले. त्याचबरोबर  भ्रष्टाचारविरोधी सात विधेयके मंजूर करण्याची योजना असल्याचेही राहुल म्हणालेत. येत्या निवडणुकांमध्ये  उमेदवार निवडताना पंधरा टक्के लोकसभा मतदारसंघात स्थानिक कार्यकर्ते, ग्रामीण भागातील नागरिकांचे मत विचारात घेतले जाईल. वर्षभरापूर्वी अस्तित्वात आलेल्या आम आदमी पक्षाची दखल राहुल गांधी यांना घ्यावी लागली. नवीन माणसे सभोवती दिसत आहेत त्यांच्यापासून सावध राहण्याची गरज आहे.