भारतात सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ऑक्सफर्ड विद्यापीठाने विकसित केलेल्या लशीचे उत्पादन करत आहे. भारतात ‘कोविशिल्ड’ असे या लशीचे नाव आहे. भारतात डिसेंबरपर्यंत ही लस तयार असेल. २०२१ च्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या तिमाहीत या लशीचे १० कोटी डोस बनून तयार होतील. पुणेस्थित सिरम सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे प्रमुख अदर पूनावाला यांनी स्वत: ही माहिती दिली आहे. ते एनडीटीव्हीशी बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“‘कोविशिल्ड’ लशीच्या मानवी चाचण्या डिसेंबरपर्यंत संपतील आणि जानेवारीपासून ही लस उपलब्ध होऊ शकते” असे अदर पूनावाला यांनी म्हटले आहे. ब्रिटनमध्येही ऑक्सफर्ड लशीच्या चाचण्या पूर्ण होण्याच्या टप्प्यावर आहेत. “यूकेने त्यांचा डाटा शेअर केला आणि लस सुरक्षित असल्याची खात्री असेल, तर आपण पुढच्या दोन ते तीन आठवडयात भारतीय नियामक यंत्रणेकडे इमर्जन्सी लायसन्ससाठी अर्ज करु शकतो. पण हे सर्व भारत सरकारची इच्छा असेल तर शक्य आहे” असे अदर पूनावाला म्हणाले.

सिरम इन्स्टिट्यूट जगातील सर्वात मोठी लस उत्पादक कंपनी आहे. फक्त ऑक्सफर्ड-अस्त्राझेनेकाच नाही, तर सिरम इन्स्टिट्यूट करोना व्हायरसवर अन्य लशींच्या उत्पादनावरही काम करत आहे. संपूर्ण जगाला त्रस्त करुन सोडणाऱ्या या व्हायरसला रोखण्यासाठी जगभरात १५० पेक्षा जास्त लशींचे उत्पादन सुरु आहे. त्यात ३८ लशी मानवी चाचणीच्या वेगवेगळया टप्प्यावर आहेत.

मॉर्डना, पीफायझर आणि अस्त्राझेनेकाची लस अंतिम टप्प्यात आहे. ऑक्सफर्डच्या लशीबद्दल सध्या तरी कुठलीही चिंता नाही, असे अदर पूनावाला यांनी सांगितले. “कोविशिल्ड ही दोन डोसची लस आहे. लशीच्या दोन डोसमध्ये २८ दिवसांचे अंतर असेल” असे पूनावाला यांनी सांगितले. “सरकार बरोबर आमची बोलणी सुरु आहेत. त्यामुळे लशीची किंमत किती असेल, याबद्दल अजून आम्ही काहीही म्हटलेलं नाही. पण ही लस काहीशे रुपयांच्या रेंजमध्ये असेल” असे पूनावाला म्हणाले. सानोफी-जीएसके आणि मॉर्डनापेक्षा सिरम इन्स्टिट्यूटच्या लशीचे दर परवडणारे असतील, असे पूनावाला यांनी सांगितले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: When will covid vaccine be available serum institue adar poonawalla dmp
First published on: 28-10-2020 at 17:54 IST