वॉशिंग्टन : ‘एच-१बी’ व्हिसासाठी जाहीर केलेले एक लाख डॉलर (सुमारे ८८ लाख रुपये) हे नवीन शुल्क केवळ नवीन अर्जदारांसाठी असून ते एकदाच भरायचे आहे, असे अमेरिका सरकारने स्पष्ट केले आहे. या खुलाशामुळे विशेषत: लाखो भारतीय ‘एच-१बी’ व्हिसाधारकारांना दिलासा मिळाला आहे. शुक्रवारी शुल्कवाढीची घोषणा करताना याबद्दल संदिग्धता राखल्यामुळे सध्याच्या ‘एच-१बी’ व्हिसाधारकांमध्ये गोंधळ उडाला होता.
सध्या अमेरिकेबाहेर गेलेल्या अशा व्हिसाधारकांना २४ तासांच्या आत परत येण्याच्या सूचना अमेरिकेच्या ‘इमिग्रेशन ॲटर्नी’ आणि नियोक्ता कंपन्यांनी केल्या होत्या. अन्यथा त्यांना अमेरिकेबाहेर अडकून पडावे लागेल आणि अतिरिक्त शुल्क भरल्याशिवाय अमेरिकेत पुन्हा प्रवेश मिळणार नाही, असा इशारा देण्यात आला होता. मात्र, आता तसे होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
‘यूएस सिटिझनशिप अँड इमिग्रेशन सर्व्हिसेस’ने (यूएससीआयएस) शनिवारी यासंबंधी एक निवेदन प्रसृत करून माहिती दिली. व्हाइट हाऊसच्या अधिकाऱ्यांनी ‘पीटीआय’ला दिलेल्या माहितीनुसार, एक लाख डॉलर शुल्क केवळ नव्या अर्जदारांना लागू असणार आहे. व्हिसा नूतनीकरणासाठी किंवा सध्याच्या व्हिसाधारकांना हे शुल्क भरावे लागणार नाही. ‘एच-१बी’ व्हिसाचे वाटप लॉटरी पद्धतीने केले जाते. आगामी लॉटरीपासून नवे शुल्क पहिल्यांदा लागू होईल. २०२५च्या लॉटरीत व्हिसा मिळालेल्यांना ते लागू असणार नाही.
‘यूएससीआयएस’चा खुलासा
– अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घोषणा केलेले नवे ‘एच-१बी’चे नियम केवळ नव्या, संभाव्य अर्जदारांना लागू होतील.
– २१ सप्टेंबरपूर्वी ‘एच-१बी’ व्हिसा मिळालेल्यांना या शुल्कवाढीचा फटका बसणार नाही.
– सध्या अमेरिकेबाहेर असलेल्या ‘एच-१बी’ व्हिसाधारकांना अमेरिकेत परत येण्यासाठी शुल्क देण्याची गरज पडणार नाही.
गोंधळ, घबराटीचे कारण
अमेरिकेचे वाणिज्यमंत्री हॉवर्ड लुटनिक यांनी ट्रम्प यांच्या निर्णयाबद्दल शुक्रवारी केलेल्या वक्तव्यामुळे गोंधळ उडून अमेरिकेतील ‘एच-१बी’ व्हिसाधारक भारतीयांमध्ये भीती आणि चिंतेचे वातावरण पसरले होते. “ट्रम्प यांच्या घोषणेनंतर ‘एच-१बी’ व्हिसासाठी शुल्कवाढ सध्या देशात असलेल्यांनाही लागू होणार का,” असा प्रश्न लुटनिक यांना विचारण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना, “नूतनीकरण, पहिल्यांदा अर्ज करणारे याबद्दल कंपनीने विचार करायचा आहे. सरकारला एक लाख डॉलर द्यावेत इतकी ती व्यक्ती महत्त्वाची आहे का? की त्यांना घरी पाठवावे आणि त्यांच्या जागी अमेरिकी कर्मचाऱ्यांना नियुक्त करावे?” लुटनिक यांच्या या उत्तरामुळे, व्हिसा नूतनीकरणासाठीही शुल्क भरावे लागणार, असा समज पसरला होता.
‘निर्णय मागे घेण्याचा प्रयत्न’
नवी दिल्ली : अमेरिकेने घाईघाईने व्हिसा शुल्कवाढीचा निर्णय घेतला आणि आता तो मागे घेण्याचा प्रयत्न केला जात आहे, अशी टीका माजी राजनैतिक अधिकारी महेश सचदेव यांनी रविवारी केली. ‘एच-१बी’ व्हिसाधारकांच्या अमेरिकी नियोक्त्यांनी दबाव टाकल्यामुळे या निर्णयामध्ये अंशतः बदल केला जात आहे, असे निरीक्षण सचदेव यांनी नोंदवले. तरीही यामुळे अमेरिकेमध्ये तंत्रकुशल कर्मचाऱ्यांच्या मुक्त प्रवेशावर परिणाम होईल, अशी शक्यताही त्यांनी व्यक्त केली.