White House Clarification on H-1B Visa : अमेरिकेतील डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने एच-१बी व्हिसावरील शुल्क वाढवलं आहे. या व्हिसासाठी आता एक लाख डॉलर्स (साधारण ८८ लाख रुपये) मोजावे लागणार आहेत. यामुळे अमेरिकेत कामासाठी गेलेल्या आणि जाऊ इच्छिणाऱ्या हजारो भारतीय तंत्रकुशल कामगारांना सर्वाधिक फटका बसणार आहे. दरम्यान, ट्रम्प प्रशासनाच्या या निर्णयामुळे जगभरात खळबळ उडाली आहे. तसेच या धोरणातील नियमांवरून लोकांमध्ये गोंधळ उडाला आहे.

काही माध्यमांनी दावा केला आहे की हे वार्षिक शुल्क असेल, तसेच एच-१बी व्हिसाधारकांना अस्तित्वात असलेल्या व्हिसाचा कालावधी संपल्यानंतर एक लाख डॉलर्स मोजून नवा व्हिसा काढावा (h1b visa renewal) लागेल अथवा अमेरिका सोडून मायदेशी परतावं लागेल. या सर्व गोंधळाच्या पार्श्वभूमीवर व्हाईट हाऊसने शनिवारी एक अधिकृत स्पष्टीकरण जारी करत सर्व अफवांचं खंडण केलं आहे.

व्हाईट हाऊसकडून सर्व अफवांचं खंडण

व्हाईट हाऊसने म्हटलं आहे की “एच-१बी व्हिसाच्या शुल्कवाढीचा निर्णय हा ट्रम्प प्रशासनाच्या इमिग्रेशनविरोधीत धोरणाचा भाग आहे. तसेच अमेरिकन नागरिकांसाठी अमेरिकेतच नोकऱ्या निर्माण करणं हे यामागचं प्रमुख उद्दीष्ट आहे. एच-१बी व्हिसासाठी एक लाख डॉलर्स हे शुल्क केवळ नवीन अर्जदारांना लागू असणार आहे. सध्याच्या व्हिसाधारकांवर त्याचा परिणाम होणार नाही. या नव्या धोरणामुळे कोणत्याही एच-१बी व्हिसाधारकाच्या अमेरिकेतून बाहेर जाण्यावर किंवा परतण्यावर गदा येणार नाही.” व्हाईट हाऊसच्या प्रवक्त्या कॅरोलिन लेव्हिट यांनी देखील हीच माहिती एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर शेअर केली आहे.

लेव्हिट यांनी म्हटलं आहे की “जे एच-१बी व्हिसाधारक सध्या देशाबाहेर आहेत त्यांना अमेरिकेत परतण्यासाठी एक लाख डॉलर्स इतकं शुल्क भरावं लागणार नाही. विद्यमान एच-१बी व्हिसाधारकांना देशातून बाहेर जाणे व परत येण्यास कोणताही अडथळा येणार नाही. सरकारचं नवीन धोरण हे नवी अर्जदारांसाठी आहे.”

एच-१ बी व्हिसासह अमेरिकेत वास्तव्यास असलेल्या लोकांमध्ये ७० टक्के भारतीय लोक आहेत. हे प्रामुख्याने अमेरिकेतील आयटी क्षेत्रात काम करतात. मात्र, आता ट्रम्प प्रशासनाने घेतलेल्या नवीन निर्णयामुळे अमेरिकेत जाऊ इच्छिणाऱ्या भारतीयांसमोरील अडचणी वाढल्या आहेत. या निर्णयामुळे अनेकांचं स्वप्न भंग होऊ शकतं.