All About Anita Anand : कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी सत्ताधारी ‘लिबरल पार्टी’चे नेतेपद आणि पंतप्रधानपदाचा राजीनामा देण्याची सोमवारी घोषणा केली होती. मात्र, ‘लिबरल पार्टी’चा नवीन नेता निवडला जाईपर्यंत आपण पदावर कायम राहू असे त्यांनी स्पष्ट केले आहे. ५३ वर्षीय ट्रुडो २०१५ पासून कॅनडाचे पंतप्रधान असून त्यांना पक्षांतर्गत वाढते मतभेद आणि गेल्या दोन वर्षांपासून महागाई या कारणांमुळे जनतेमधील घटती लोकप्रियता या समस्या भेडसावत आहेत. दरम्यान ट्रुडो यांच्यानंतर कॅनडाच्या पंतप्रधानपदासाठी भारतीय वंशाच्या अनिता आनंद यांना प्रमुख दावेदार मानले जात आहे. अनिता आनंद सध्याच्या कॅनडा सरकारमध्ये वाहतूक मंत्री म्हणून कार्यरत आहेत. जर अनिता आनंद यांना कॅनडाच्या पंतप्रधानपदाची संधी मिळाली तर त्या जगभरातील विविध देशांच्या प्रमुखपदी निवड होणाऱ्या भारतीय वंशाच्या ३४ व्या व्यक्ती ठरतील.

कौटुंबीक पार्श्वभूमी

अनिता आनंद यांचा जन्म २० मे १९६७ रोजी नोव्हा स्कॉशियाच्या केंटविले येथे सरोज डी. राम आणि एस.व्ही. आनंद यांच्या पोटी झाला. अनिता आनंद यांचे पालक १९६० च्या दशकाच्या सुरुवातीला भारतातून कॅनडामध्ये स्थलांतरित झाले होते. अनिता आनंद यांनी ऑक्सफर्ड, डलहौसी आणि टोरंटो विद्यापीठातून राज्यशास्त्रात पदवी आणि कायद्याचे पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे.

राजकीय कारकिर्द

सक्रिय राजकारणात प्रवेश करण्यापूर्वी, अनिता आनंद यांनी येल लॉ स्कूल आणि टोरंटो विद्यापीठ यांसारख्या प्रतिष्ठित शिक्षण संस्थांमध्ये शिक्षिका म्हणून कारकिर्द केली होती. पुढे २०१९ मध्ये अनिता आनंद यांची राजकीय कारकिर्द सुरू झाली. त्यावेळी त्यांची ओकविले मतदारसंघाच्या खासदार म्हणून निवड झाली होती. कोव्हिड काळात सार्वजनिक सेवा मंत्री म्हणून, त्यांनी लस, पीपीई किट आणि ऑक्सिजनसह महत्त्वपूर्ण वैद्यकीय सुविधांचा पुरवठा सुरळीत करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यांच्या या कामासाठी अनिता आनंद यांचे कॅनडात कौतुकही झाले होते. पुढे २०२१ मध्ये संरक्षण मंत्री आणि २०२४ मध्ये त्यांना वाहतूक मंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जस्टिन ट्रुडो यांच्या जागी पंतप्रधान म्हणून निवड झाल्यास, अनिता आनंद या लिबरल पार्टीच्या पहिल्या महिला आणि कॅनडाच्या भारतीय वंशाच्या पहिल्या पंतप्रधान ठरतील. दरम्यान लिबरल पार्टीकडून आजपर्यंत कोणत्याही महिलेला कॅनडाच्या पंतप्रधानपदाची संधी मिळालेली नाही. जर अनिता आनंद यांना पंतप्रधानपदाची संधी मिळाली तर, कॅनडाच्या राजकारणातील हा एक महत्त्वाचा टप्पा ठरेल.