Who is B Sudershan Reddy : जगदीप धनखड यांनी उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिल्यानंतर उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने अधिसूचनाजारी केली आहे. त्यामुळे आता नवे उपराष्ट्रपती कोण होणार? याकडे अनेकांच्या नजरा लागलेल्या आहेत. या पार्श्वभूमीवर दिल्लीत घडामोडींना वेग आला आहे. उपराष्ट्रपती पदासाठी एनडीएकडून महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

तसेच विरोधकांच्या इंडिया आघाडीने देखील त्यांच्या उमेदवाराच्या नावाची घोषणा केली आहे. सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती सुदर्शन रेड्डी यांना उपराष्ट्रपती पदासाठी इंडिया आघाडीकडून उमेदवारी देण्यात आली आहे. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी सुदर्शन रेड्डी यांच्या नावाची घोषणा केली आहे. रेड्डी हे आता उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी नामांकन अर्ज दाखल करणार आहेत. दरम्यान सुदर्शन रेड्डी नेमकं कोण आहेत? त्यांच्याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेऊयात.

कोण आहेत सुदर्शन रेड्डी?

उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी सुदर्शन रेड्डी हे इंडिया आघाडीचे उमेदवार आहेत. ७८ वर्षीय सुदर्शन रेड्डी हे सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती आहेत. सुदर्शन रेड्डी यांनी हैदराबाद येथे वकील म्हणून त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात केली होती. सुदर्शन रेड्डी यांचा जन्म ८ जुलै १९४६ रोजी झाला. सुदर्शन रेड्डी यांनी डिसेंबर १९७१ मध्ये आंध्र प्रदेशमध्ये वकिली केली. तसेच आंध्र प्रदेश उच्च न्यायालयात सिव्हिल प्रकरणांमध्ये वकिली केलेली आहे. तसेच १९८८ ते १९९० या दरम्यान आंध्र प्रदेश उच्च न्यायालयात सरकारी वकील म्हणून सुदर्शन रेड्डी यांनी काम पाहिलेलं आहे.

तसेच १९९० मध्ये केंद्राचे अतिरिक्त वकील म्हणून काही काळ काम पाहिलेलं आहे. या बरोबरच सुदर्शन रेड्डी यांनी उस्मानिया विद्यापीठासाठी कायदेशीर सल्लागार म्हणूनही काम पाहिलेलं आहे. १९९५ मध्ये सुदर्शन रेड्डी हे आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाचे न्यायाधीश झाले. त्यानंतर डिसेंबर २००५ मध्ये सुदर्शन रेड्डी यांची गुवाहाटी उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून बढती मिळाली.

तसेच १२ जानेवारी २००७ रोजी सुदर्शन रेड्डी हे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश झाले. त्यानंतर ८ जुलै २०११ रोजी निवृत्त होईपर्यंत ते सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश होते. तसेच २०१३ मध्ये रेड्डी यांनी गोव्याचे पहिले लोकायुक्त झाले होते. मात्र, सात महिन्यांच्या कालावधीत त्यांनी वैयक्तिक कारणांमुळे राजीनामा दिला होता.

स्वातंत्र्य पूर्व काळात जन्म ते सर्वोच्च न्यायालयात न्यायदान!

दरम्यान, सुदर्शन रेड्डी यांचा जन्म स्वातंत्र्यपूर्ण काळात (८ जुलै १९४६ रोजी) झाला. सुदर्शन रेड्डी यांनी आपल्या कारकि‍र्दीची सुरूवात वकील म्हणून केली होती. त्यानंतर त्यांनी वकील म्हणून काही काळ काम पाहिलं आणि त्यानंतर ते थेट सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश पदापर्यंत पोहोचले. आता उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी त्यांना इंडिया आघाडीकडून उमेदवारी मिळाली आहे.