केंद्रात २०१४ साली सत्तेत आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दशकभर आपली जादू कायम ठेवली आहे. २०१९ ची लोकसभा निवडणूक असो किंवा राज्या-राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुका असो.. अनेक ठिकाणी मोदी यांनी भाजपाला निर्विवाद यश मिळवून दिले. इंडिया टुडेने ‘मूड ऑफ द नेशन’ या उपक्रमा अंतर्गत देशातील जनमताचा सर्व्हे घेतला. ज्यामध्ये मोदी पंतप्रधानपदाची हॅटट्रिक साधणार असल्याचे सांगण्यात येत आहे. पंतप्रधान मोदींशिवाय दुसरा कोणता नेता त्यांची जागा घेण्यासाठी योग्य आहे, असाही एक प्रश्न सर्व्हेद्वारे विचारण्यात आला होता. लोकांनी कोणत्या नेत्याला किती पसंती दिली, ते पाहूया.

मूड ऑफ द नेशन सर्व्हेमध्ये सर्वाधिक पसंती केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या नावाला मिळाली आहे. शाह यांना २९ टक्के लोकांनी पसंती दिली. तर त्यांच्या खालोखाल उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा क्रमांक लागतो. त्यांना २५ टक्के लोकांनी पसंती दिली. तर केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना १६ टक्के लोकांनी पंतप्रधानपदाससाठी पसंती दिली.

इंडिया आघाडीला महाराष्ट्रात ४८ पैकी २६ जागा मिळणार; वाचा सर्व्हे काय सांगतात?

इंडिया टुडेच्या मूड ऑफ द नेशन फेब्रुवारी २०२४ या सर्व्हेमध्ये सर्व लोकसभा मतदारसंघातील ३५,८०१ लोकांचे मत जाणून घेण्यात आले. १५ डिसेंबर २०२३ ते २८ जानेवारी २०२४ या कालावधीदरम्यान हा सर्व्हे पूर्ण करण्यात आला. सर्व्हेचे निष्कर्ष देत असताना ते बरोबर असतीलच असे नाही, अशी पुष्टीही जोडण्यात आलेली आहे.

२०१४ नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेमध्ये जराही घसरण झाली नाही. मोदी आणि शाह जोडीने २०१४ नंतरच्या अनेक निवडणुकांमध्ये भाजपाला एकहाती विजय मिळवून दिला. अमित शाह यांना तर भाजपामधील चाणक्य असेही संबोधले गेले. भाजपाला पुढे घेऊन जाण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा राहिला आहे.

मोदींचं ४०० जागांचं स्वप्न भंगणार? इंडिया आघाडीला किती जागा मिळणार? वाचा ओपिनिअन पोलचे अंदाज काय सांगतात

दुसरीकडे योगी आदित्यनाथ यांनी सलग दुसऱ्यांदा उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी राहण्याचा विक्रम केला. भाजपा कार्यकर्त्यांमध्ये योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल वेगळाच आदर आहे. प्रखर हिंदुत्ववादी, वाद ओढवून न घेणारे, उत्तर प्रदेशच्या गुंडाराजवर नियंत्रण आणणारे.. अशी स्वतःची वेगळी ओळख योगी आदित्यनाथ यांनी बनविली आहे. फक्त उत्तर प्रदेशच नाही तर इतर राज्यातही ते लोकप्रिय झाले आहेत.

दरम्यान महाराष्ट्रातील नेते, नागपूरमधून खासदारकी भूषविणारे नितीन गडकरी यांची सर्वपक्षीय कार्यकर्त्यांमध्ये एक वेगळीच ओळख आहे. नितीन गडकरी आपल्या कार्यतत्परतेसाठी ओळखले जातात. देशभरात रस्त्यांचे जाळे विणण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. भ्रष्टाचार मुक्त कारभार, कंत्राटदारांना लगाम घालणे आणि बाबूशाहीला चाप लावण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.