गेल्या काही महिन्यांपासून जगभरात आणि भारतात देखील करोनाबाधितांच्या आणि करोनामुळे होणाऱ्या मृत्यूंच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर घट झाली होती. या पार्श्वभूमीवर जगभरात एक प्रकारचं दिलासादायक वातावरण निर्माण झालं होतं. मोठ्या प्रमाणावर निर्बंधांमध्ये शिथिलता आणण्यात आली होती. मात्र, गेल्या काही दिवसांमध्ये पुन्हा एकदा करोना बाधितांची संख्या वाढू लागली आहे. चीनच्या काही भागांमध्ये लॉकडाउन लागू करण्यात आला आहे. तसेच, आफ्रिकेतील काही देशांना देखील याचा फटका बसला आहे. करोनाचा नवा व्हेरिएंट बीए.२ नं देखील चिंता वाढवलेली असताना आता WHO नं जगभरातल्या देशांना गंभीर इशारा दिला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गेल्या आठवड्याभरापासून जगभरात अनेक ठिकाणी करोनाबाधितांचा आकडा वाढू लागला आहे. या पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटना अर्थात WHO कडून इशारा देण्यात आला आहे. “काही देशांमध्ये करोनाच्या चाचण्या करण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर घटलं आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांत वाढलेलं करोनाबाधितांचं प्रमाण चिंताजनक आहे”, असं WHO कडून सांगण्यात आलंल्याचं वृत्त रॉयटर्सनं दिलं आहे.

अचानक करोना का वाढू लागला?

करोनाबाधितांच्या संख्येत अचानक वाढ का होऊ लागली? यासंदर्भात WHO नं काही ठोकताळे मांडले आहेत. एकीकडे ओमायक्रॉन आणि बीए.२ मुळे वेगाने प्रसार होत अशताना दुसरीकडे अनेक ठिकाणी निर्बंध शिथिल करण्यात आल्याचा देखील परिणाम बाधितांची संख्या वाढण्यात झाला असावा, असं WHO नं म्हटलं आहे. तसेच, काही देशांमध्ये लसीकरणाविषयी गैरसमज आणि जनजागृतीचा अभाव या गोष्टी देखील करोनाबाधितांचा आकडा वाढण्यास कारणीभूत ठरल्या असण्याची शक्यता WHOनं व्यक्त केली आहे.

पुढे काय वाढून ठेवलंय?

दरम्यान, WHOनं जगभरातल्या देशांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. “काही देशांनी करोनाच्या चाचण्या करण्याचं प्रमाण कमी केलं आहे. मात्र, तरीदेखील बाधितांचा आकडा वाढू लागला आहे. याचाच अर्थ असा, की आपण आत्ता जे काही बाधितांचे आकडे पाहातोय, ते फक्त हिमनगाचं टोक आहे”, असं WHOकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

आकडेवारी काय सांगते…

गेल्या आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात जगभरात बाधितांची संख्या तब्बल ८ टक्क्यांनी वाढली आहे. एकूण १ कोटी १० लाख नव्या बाधितांची भर पडली असून ४३ हजार बाधितांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. ही आकडेवारी ७ मार्च ते १३ मार्च या आठवड्याभरातली आहे. प्रामुख्याने दक्षिण कोरिया आणि चीनमध्ये मोठ्या प्रमाणावर रुग्णसंख्या आणि मृत्यू वाढले आहेत. त्याचं प्रमाण सरासरी २५ टक्के आणि २७ टक्के इतकं नोंदवण्यात आलं आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Who warns of huge corona outbreak after recent rise in infection and deaths pmw
First published on: 17-03-2022 at 11:05 IST