Mood Of The Nation Survey : आगामी लोकसभा निवडणुकीची तयारी जोरदार सुरू झाली असून सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली एनडीए पुन्हा सत्ता स्थापन करणार की नव्याने निर्माण झालेल्या इंडिया आघाडीला संधी मिळणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. दरम्यान, इंडिया टुडे आणि सी वोटरचा मूड ऑफ दि नेशन हा सर्वे जाहीर झाला असून यानुसार, आता निवडणुका झाल्यातर एनडीए सरकार सत्तेवर येईल. मात्र, मागच्या वेळेपेक्षा यंदा कमी जागा त्यांना मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दरम्यान, नरेंद्र मोदी यांचा उत्तराधिकारी म्हणून काही राष्ट्रीय नेत्यांना जनतेने पसंत केलं असल्याचंही या सर्वेक्षणातून समोर आलं आहे.

हेही वाचा >> Opinion Poll : लोकसभा निवडणुकीत INDIA की NDA ठरणार वरचढ? भाजपाच्या जागा घटणार, पण…

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उत्तरार्धात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे सर्वात योग्य नेते आहेत, असं या सर्वेक्षणातून समोर आलं आहे. २९% प्रतिसादकर्त्यांनी सांगितले की, अमित शहा हे पंतप्रधान मोदींचे उत्तराधिकारी म्हणून सर्वात योग्य आहेत, त्यानंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा क्रमांक लागतो. २६ टक्के लोकांनी योगी आदित्यनाथ यांचे समर्थन केले तर १५ टक्के लोकांनी नितीन गडकरींच्या बाजूने मतदान केले.

६३ टक्के लोक नरेंद्र मोदींच्या कामगिरीवर समाधानी

मूड ऑफ दि नेशनच्या सर्वेक्षणातून असंही सिद्ध झालं आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामगिरीवर ६३ टक्के लोक समाधानी आहेत. जानेवारी झालेल्या सर्वेक्षणात हीच टक्केवारी ७२ टक्के होती.

एनडीएला बहुमत, पण जागा घटणार

जानेवारी २०२३ मध्ये इंडिया टुडेने केलेल्या सर्वेनुसार एनडीएला २९८ जागांचा अंदाज वर्तवण्यात आला होता. परंतु, आताच्या सर्वेनुसार एनडीए ३०६ जागांवर यश मिळवू शकते असं म्हटलं आहे. परंतु, २०१९ मध्ये एनडीएने लोकसभा निवडणुकीत ३५७ जिंकल्या होत्या. म्हणजेच या सर्वेनुसार, भाजपा सत्ता स्थापन करण्यास यशस्वी झाली तरी त्यांची जागांची एकूण आकडेवारी कमी झालेली असेल. तर, दुसरीकडे नव्याने स्थापन झालेल्या इंडिया आघाडीला १९३ जागा मिळतील असा अंदाज आहे. जानेवारीतील सर्व्हेक्षणानुसार, विरोधकांना १५३ जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला होता.

कोणाची टक्केवारी किती असेल?

आज सार्वत्रिक निवडणुका झाल्यास एनडीएला एकूण ४३ टक्के मते तर इंडिया आघाडीला ४१ टक्के मते मिळतील असंही मूड ऑफ द नेशनच्या सर्वेक्षणात म्हटलं आहे.

भाजपा आणि काँग्रेसला किती जागा मिळणार?

एनडीए आघाडीवर असला तरी भाजपा २८७ जागांवर विजयी होईल, तर, काँग्रेस अवघ्या ७४ जागांवर यश मिळवू शकेल असं म्हटलं आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला ३०३ जागा मिळाल्या होत्या. मात्र, ओपिनिअन पोलनुसार, आज निवडणुका झाल्या तर भाजपाचा जागा घटण्याची शक्यता आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कसं झालं सर्वेक्षण

१५ जुलै ते १४ ऑगस्टदरम्यान केलेल्या या सर्वेक्षणासाठी सर्व राज्यांमध्ये २५ हजार ९५१ लोकांशी संवाद साधण्यात आला. तसंच, नियमित ट्रॅकर डेटाव्यतिरिक्त १ लाख ३४ हजार ४८७ मतदारांच्या मुलाखती घेऊन हा अहवाल काढण्यात आला आहे.