भारतीय जनता पार्टी आणि एआयएमआयएम पक्षाचे नेते सतत एकमेकांवर हल्लाबोल करत असतात. दोन्ही पक्षांचे नेते एकमेकांवर टीका करण्याची संधी सोडत नाहीत. आता ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहाद-उल-मुस्लिमीन (एआयएमआयएम) पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी आसाम सरकारवर निशाणा साधला आहे. ओवैसी यांनी आसाम सरकारच्या बालविवाहासंबंधीच्या कारवाईवरून आसाम सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला आहे. ओवैसी यांनी सवाल उपस्थित केला आहे की, “बालविवाहप्रकरणी सरकारच्या कारवाईनंतर त्या मुलींची देखभाल कोण करणार?”

माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत असताना ओवैसी म्हणाले की, “गेल्या सहा वर्षांपासून राज्य सरकार शांत होतं. हे या सरकारचं अपयश आहे.” आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सर्मा शनिवारी म्हणाले की, “राज्यातील पोलिसांनी अलिकडेच सुरू केलेली बालविवाहाविरोधातील मोहीम ही २०२६ पर्यंत सुरू राहील.”

राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार १४ वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या मुलींशी लग्न करणाऱ्यांविरोधात लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण करणाऱ्या पोक्सो (POCSO) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला जाईल. तर ज्या लोकांनी १४ ते १८ या वयोगटातील मुलींशी लग्न केलं आहे त्यांच्याविरोधात बालविवाह प्रतिबंध कायदा २००६ अंतर्गत कारवाई केली जाईल. सर्मा म्हणाले की, अल्पवयीन मुलांच्या विवाहात सहभागी असलेल्या आई-वडिलांना नोटीस देऊन सोडून दिलं जाईल, सध्या त्यांना अटक केली जाणार नाही.

आसाम सरकारच्या अधिकृत निवेदनानुसार बालविवाह प्रकरणात पोलिसांनी सुरू केलेल्या मोहीमेदरम्यान शनिवारपर्यंत राज्यात २,२५० हून अधिक लोकांना अटक करण्यात आली आहे. ओवैसी हे एका पत्रकार परिषदेत म्हणाले की, “आसाम राज्यात गेल्या सहा वर्षांपासून भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे. पण हे लोक गेली सहा वर्ष काय करत होते? तुम्ही आता जी कारवाई करत आहात ते तुमचं अपयश आहे.”

हे ही वाचा >> भारतावर कारगिल युद्ध लादणारे पाकिस्तानी माजी लष्करप्रमुख परवेज मुशर्रफ यांचे निधन

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्या मुलींची देखभाल कोण करणार?

ओवैसी म्हणाले की, “तुम्ही त्यांना (अल्पवयीन मुलींसोबत विवाह करणाऱ्या व्यक्तींना) तुरुंगात डांबत आहात, परंतु त्यानंतर त्या मुलींची देखभाल कोण करणार? मुख्यमंत्री (हिमंत बिस्व सर्मा) करतील का? त्यांचं वैवाहिक जीवन अबाधित राहील. परंतु ही कारवाई म्हणजे राज्य सरकारचं अपयश आहे. उलट तुम्ही त्या कुटुंबांना संकटात ढकलत आहात.”