why are Americans giving up their US citizenship : जगभरातील लाखो लोकांना अमेरिकेचे नागरिकत्व हवे आहे. लोक यासाठी मोठी त्याग करायला देखील तयार होतात. मात्र आता परदेशात राहणारे अनेक अमेरिकन नागरिक मोठ्या संख्येने त्यांचे नागरिकत्व सोडून देण्याचा निर्णय घेत असल्याची बाब समोर आली आहे. यामागील कारणे ही फक्त टॅक्स किंवा कायदेशीर नाहीत तर देशाचे राजकारण ज्या दिशेने जात आहे, ते पाहून आलेल्या निराशेमुळे लोक हा निर्णय घेत आहेत.

इमिग्रेशन वकील सांगतात की, असे निर्णय घेण्यामागे राजकीय असंतुष्टता हे कारण पूर्वी दुर्मीळ होते, पण आता ही बाब प्रमुख घटक बनली आहे. २०२५ च्या एका सर्वेक्षणानुसार, अमेरिकेबाहेर रहाणारे जवळजवळ अर्धे नागरिक नागरिकत्व सोडण्याचा विचार करत आहेत. यापैकी अनेकजण या निर्णयासाठी ६ जानेवारी रोजी झालेली दंगल, गोळीबाराच्या वाढत्या घटना आणि मतदानाच्या अधिकारांमध्ये झालेली घट ही कारणे देत आहेत.

द वॉशिंग्टन पोस्टच्या रिपोर्टनुसार दरवर्षी ५००० ते ६००० अमेरिकन नागरिक आपले नागरिकत्व सोडतात. यासाठीचे प्रमुख कारण हे अमेरिकेतली युनिक टॅक्स कायद्याशी संबंधित टॅक्स रिपोर्टिंगची आवश्यकता आणि लॉजिस्टिकसंबंधी अडचणींमुळे हा निर्णय घेतला गेला.

पण वकील आणि परदेशात राहणारे नागरिकांच्या मते राजकारण, खासकरून ध्रुवीकरण करणारे नेतृत्व आणि पक्षांमधील संघर्ष हे नागरिकत्व सोडण्याचे मुख्य कारण बनत चालले आहे.

लंडनमध्ये राहणाऱ्या एका अमेरिकन नागरिकाने कारवाई होण्याच्या भीतीने त्याचे नाव गुप्त ठेवण्याच्या अटीवर सांगितले की, त्याने डोनाल्ड ट्रम्प पुन्हा निवडून आल्याचे कळल्याच्या दुसऱ्याच दिवशी सकाळी नागरिकत्व सोडण्याची प्रक्रिया सुरू केली.

एकीकडे परदेशात राहाणारे अमेरिकन नागरिक देशाचे नागरिकत्व सोडत आहेत, तर दुसरीकडे अनेक जण सर्वकाही पणाला लावून डंकी मार्गाने देशात प्रवेश करण्याचा प्रयत्न करत आहेत. जगभरातील असे स्थलांतरित अनेक धोके पत्करून, एजंटांना लाखो रुपये देऊन अमेरिकेत प्रवेश करतात. दरवर्षी हजारो लोक या धोकादायक प्रवासामध्ये आपला जीव गमावतात. मात्र यादरम्यान अमेरिकेतील डोनाल्ड ट्रम्प प्रशासन मात्र नागरिकत्व मिळवण्याची प्रक्रिया आणखी कठीण करत आहे.

अमेरिकेचे नागरिकत्व सोडण्यामागे कारण काय?

अमेरिका अशा देशांपैकी एक आहे जे आपल्या नागरिकांवर ते कोठेही राहत असले तरी कर लावतात. म्हणजेच परदेशात राहणाऱ्या अमेरिकेच्या नागरिकांना वार्षिक टॅक्स रिटर्न भरणे बंधनकारक असते आणि त्यांना संभाव्य दंड किंवा डबल टॅक्सेशनचाही (double taxation) सामना करावा लागतो. यामुळे परदेशात राहाणारे अमेरिकन नागरिक बऱ्याच काळापासून त्रास सहन करत आले आहेत.

अमेरिकेच्या कठोर रिपोर्टींग कायद्यांमुळे काही परदेशी बँका तर अमेरिकन ग्राहकांना सेवा देण्यास नकारही देतात. रिपोर्टनुसार, काही बँकांमध्ये अमेरिकन नागरिकांना बँक खाते उघडता येत नाही किंवा त्यांना जास्त शुल्क द्यावे लागते.

पण सध्या अनेरिकेचे नागरिकत्व सोडण्याची लाट उसळली आहे, ज्यात Renounce US Citizenship – Why and How या जवळपास ३००० सदस्य असलेल्या फेसबुक ग्रुपमधील सदस्यांचाही सहभाग आहे. लोक नागरिकत्व सोडण्यामागे अमेरिकेतील राजकारण आणि धोरणे याबद्दल असलेली नाराजी हे कारण देत आहेत.

लंडनमधील वकील माया बकली यांनी सांगितले की, नागरिकत्व सोडण्याचे प्रमुख कारण राजकारण असल्याचे सातत्याने सांगितले जात आहे. २०२५ च्या ग्रीनबॅक (Greenback) सर्वेक्षणात असे आढळून आले की, परदेशात राहणारे जवळपास अर्धे अमेरिकन नागरिक नागरिकत्व सोडण्याचा विचार करत आहेत, त्यापैकी अर्ध्याहून अधिक नागरिक राजकीय असंतोष हे कारण देत आहेत. रिपोर्टनुसार, यापैकी ६१ टक्के लोकांनी त्यांच्या कारणांमध्ये कराचा उल्लेख केला आहे आणि ५१ टक्के जणांनी आपण अमेरिकन सरकार किंवा राजकीय दिशा याबद्दल असमाधान हे कारण दिले आहे.

ट्रम्प यांच्या विजयानंतर नागरिकांचा कॅनडाकडे ओढा वाढला

नोव्हेंबरमध्ये राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीनंतर जानेवारी महिन्यात कॅनडात अमेरिका सोडण्याच्या नागरिकांच्या चौकशीमध्ये ३०० टक्के वाढ झाल्याची माहिती कॅनडामध्ये एका वकिलाने दिली आहे

कॅनडा-स्थित वृत्तसंस्था CBC ने दिलेल्या अहवालानुसार, टोरंटोमधील एका इमिग्रेशनवकिल मारिओ बेल्लिसिमो (Mario Bellissimo) यांनी सांगितले की, नोव्हेंबरमधील निवडणुकीनंतर त्यांच्या फर्मकडे आलेल्या चौकशीमध्ये ३०० टक्क्यांची वाढ झाली आणि २० जानेवारीच्या शपथविधीनंतरही पुन्हा एकदा अशीच वाढ दिसून आली.