Raghuram Rajan on Trump Tariffs: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर लादलेल्या ५० टक्के आयातशुल्कावर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. इंडिया टुडे टीव्हीला दिलेल्या मुलाखतीमध्ये बोलताना राजन म्हणाले की, आयातशुल्क लादण्याचा निर्णय हा व्यापार अर्थशास्त्राच्या पलीकडे जाऊन व्यापक धोरणाचा भाग आहे.
या मुलाखतीत बोलताना राजन म्हणाले, टॅरिफचा (आयातशुल्क) वापर केवळ व्यापाराचे साधन म्हणून नाही तर राजकीय आणि आर्थिक शक्ती वापरण्याचे साधन म्हणूनदेखील केला जात आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर टॅरिफ वाढविण्यामागे अनेक कारणे आहेत, असे रघुराम राजन म्हणाले. “चालू खात्यातील तूट, व्यापारी तूट यामुळे इतर देश अमेरिकेला स्वस्त वस्तू पाठविण्याऐवजी अमेरिकेकडून नफा कमावत आहेत. याचा लाभ अमेरिकन ग्राहकांना होत असल्याची समज ट्रम्प यांची झाली असावी”, असे ते म्हणाले.
रघुराम राजन यांच्या मते, १९८० च्या दशकापासून ट्रम्प यांचे हे मत आहे. तेव्हा ते जपानवर टीका करत होते. राजन म्हणाले की, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प हे टॅरिफला खेळ असल्याप्रमाणे वागवत आहेत.
“आणखी एक कारण म्हणजे, ट्रम्प यांना वाटते की, टॅरिफ हे अमेरिकन ग्राहकांऐवजी बाहेरच्या देशांवर कर म्हणून काम करते. त्यामुळे महसूल मिळविण्याचा हा एक सोपा मार्ग आहे. ज्यामुळे ते इतर कर कमी करू शकतात, जे त्यांनी अलीकडे वाढवले होते”, असेही रघुराम राजन म्हणाले.
रघुराम राजन पुढे म्हणाले की, टॅरिफ हे एकप्रकारे बळाचा वापर करण्यासारखे झाले आहे. अमेरिकेला जेव्हा लष्कराचा वापर करायचा नसतो तेव्हा ते अशाप्रकारे इतर मार्गातून बळाचा वापर करतात. पण या मार्गामुळे इतर देशांना नुकसान होऊ शकते, असेही राजन यांनी लक्षात आणून दिले.
भारताला एकटे पाडले जात आहे?
इतर आशियाई देशांच्या तुलनेत भारताला अधिक लक्ष्य केले जात आहे का? असा प्रश्न इंडिया टुडे टीव्हीच्या मुलाखतीत रघुराम राजन यांना विचारण्यात आला. तेव्हा ते म्हणाले की, हो हे खरे आहे, यात कोणताही प्रश्न नाही. त्यांनी पुढे म्हटले की, भारत सुरुवातीला इतर आशियाई देशांप्रमाणेच २० टक्के आयातशुल्काच्या श्रेणीत ठेवण्यासाठी अमेरिकेशी चर्चा करत होता.