Bride Threatens Groom with Knife: राजा आणि सोनम रघुवंशी प्रकरणाचा गुंता अद्याप सुटलेला नसताना या प्रकरणासारख्याच अनेक घटना ठिकठिकाणी उघडकीस येत आहेत. उत्तर प्रदेशच्या प्रयागराज येथील एका नवविवाहित जोडप्यामधील वाद पोलीस ठाण्यात पोहोचला, तेव्हा पोलीसही घटनाक्रम ऐकून चक्रावून गेले. प्रयागराज येथील कॅप्टन निषादचं सितारा देवी नामक तरुणीशी लग्न झालं. मात्र लग्नानंतर तीन रात्री त्यानं दहशतीत घालवल्या. मधुचंद्राच्या पहिल्याच रात्री पत्नी सितारा देवी हातात सुरा घेऊन बसली होती. जर माझ्या जवळ आलास तर तुझे ३५ तुकडे करेन, अशी धमकी पत्नीनं दिली असा दावा पती कॅप्टन निषादनं केला आहे.
कॅप्टन निषादनं तक्रारीत म्हटलं की, पत्नी सितारा देवी मधुचंद्राच्या रात्री कोपऱ्यात जाऊन बसली होती. तिच्या हातात सुरा होता. “माझ्याजवळ येऊ नको, मी अमनची आहे. जवळ आलास तर तुझी खांडोळी करेन”, अशी धमकी सितारानं दिली. २६ वर्षीय पती कॅप्टन निषादनं पोलिसात तक्रार देऊन तीन रात्रींचा घटनाक्रम सांगितला.
कॅप्टन निषाद आणि सितारा देवी यांचं लग्न २९ एप्रिल रोजी झालं होतं. ३० एप्रिल रोजी सितारा कॅप्टनच्या घरी आली. २ मे रोजी लग्नाचा रिसेप्शन सोहळा पार पडला. त्या रात्री नातेवाईक आणि पाहुणेमंडळी लग्नातील सोहळ्याचा आनंद लुटत असताना दुसऱ्या बाजूला कॅप्टन निषादला मात्र वेगळ्याच अनुभवाला सामोरं जावं लागलं.
“मी जेव्हा आमच्या खोलीत गेलो, तेव्हा सितारा शांत आणि एका कोपऱ्यात गुपचूप बसल्याचं मी पाहिलं. तिच्या हातात सुरा होता. मी जवळ जाताच ती मोठ्यानं ओरडली.’मला हात लावू नको. मी अमनची आहे. (सिताराचा प्रियकर) जर मला हात लावलास तर तुझे ३५ तुकडे करेन’, अशी धमकी सितारानं दिली. यानंतर मी थबकलो. त्यानंतर मी रात्रभर सोफ्यात बसून राहिलो तर सितारा बेडवर होती. त्या रात्री मला झोपच लागली नाही”, अशी माहिती कॅप्टन निषादनं दिली.
निषाद म्हणाला की, तीन रात्री आम्ही अशाच काढल्या. ती मध्यरात्री झोपी जायची. पण ती कधीही माझ्यावर हल्ला करेल, या भीतीने मी जागाच असायचो. वर्तमानपत्रात अशाप्रकारच्या अनेक बातम्या मी वाचल्या होत्या. मला त्याप्रकारची बातमी व्हायचे नव्हते.
सितारा देवीनं काढला पळ
लग्नानंतर दहशतीत आलेल्या कॅप्टन निषादने हा सर्व प्रकार त्याच्या आईला सांगितला. यानंतर घरात वादळ उठलं. सितारा देवीच्या घरच्यांनाही याची कल्पना दिली गेली. दोन्ही कुटुंबियांनी एकत्र बसून सितारा देवीची समजूत काढली आणि कॅप्टनबरोबर राहण्याचा सल्ला दिला. मात्र तरीही ३० मे च्या रात्री सितारानं घरातून पळ काढला. सितारा देवी थेट अमनकडे गेल्याचं सांगितलं जात आहे.
या घटनेनंतर प्रतिक्रिया देताना कॅप्टन निषाद म्हणाला की, आता सिताराला माझ्या आयुष्यातून मी वगळलं आहे. यापुढे पुन्हा लग्न केलं तर आधीच सर्व चौकशी करेन. पण पुन्हा अशा मुलीशी लग्न करणार नाही.