५० खोके एकदम ओके हे जनता म्हणते ना. आम्ही कुठे काय म्हणतो आहोत साडेबारा कोटी लोकांना समन्स बजावणार का? महाराष्ट्रात शिवसेनेत फूट पाडली गेली ती खोक्यांच्या माध्यमातून पाडली गेली आणि जनतेला हे माहित आहे. त्यामुळेच ते अशा घोषणा देतात. मी जम्मू काश्मीरला गेलो होतो तिथे लोकांनी घोषणा दिल्या असं म्हणत संजय राऊत यांनी पुन्हा एकदा एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत गेलेल्या ४० आमदारांवर टीका केली आहे. तसंच जे समन्स बजावण्यात आलं त्यावर कायदेशीर उत्तर देऊ असंही म्हटलं आहे.

आम्ही कोणत्याही प्रक्रियेला सामोरे जायला तयार

कोणत्याही कायदेशीर प्रक्रियेला आम्ही सामोरे जायला तयार आहोत. आमची तयारी आहे. २ हजार कोटींचा आरोप केला गेला त्यात मानहानी झाली की नाही ते कोर्ट ठरवेल. महाराष्ट्रातली जनता बोलते आहे. आम्ही बोलत नाही हे काही शिवसेनेचं धोरण नाही असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.संजय राऊत यांनी काही वेळापूर्वीच प्रसारमाध्यमांशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य झालं. आमच्या विरोधात कोर्टात जा किंवा कुठेही जा. आम्ही तयार आहोत. आम्ही चोर लफंगे आहोत. कोर्टाने आमचं म्हणणंही ऐकून घेतलं पाहिजे. आम्ही कोर्टात सगळ्या आरोपांचं उत्तर देऊ. आम्ही जनतेच्या न्यायालयात प्रश्न मांडला पण ते कोर्टात गेले. आम्ही मागे हटणार नाही असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

बंड आणि गद्दारी यात फरक आहे

बंड आणि गद्दारी यामध्ये फरक आहे. त्यामुळे या लोकांनी केलंय त्याला बंड म्हणू नका. तात्या टोपे यांनी केलं ते बंड होतं. या लोकांनी जे केलं त्याला गद्दारी म्हणतात हे गद्दारच आहेत असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

वीर सावरकर यांच्याविषयी आमची काँग्रेससोबत बोलणी सुरु

वीर सावरकर या विषयावर आमचं राहुल गांधी आणि काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांशी आमचं बोलणं झालं आहे. मल्लिकार्जुन खरगे यांच्या घरी बैठक झाली. त्यात शरद पवार यांनीही भूमिका मांडली. शरद पवारांनीही हे म्हटलं की वीर सावरकर हा विषय काढण्याची गरज नाही. आपल्याला मोदींशी लढायचं आहे की वीर सावरकर यांच्याशी लढायचं आहे? हे ठरवा असंही ते म्हणाले. गोंधळ होऊ देऊ नका असंही शरद पवार म्हणाले असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नेमकं काय आहे प्रकरण?

“शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह आणि पक्षाचं नाव देण्यासाठी दोन हजार कोटी रूपयांचा सौदा झाला होता. सहा महिन्यात न्याय विकत घेण्यासाठी हा मोठा सौदा करण्यात आला. हा न्याय नाहीये, ही डील आहे. हा विकत घेतलेला न्याय आहे,” असा आरोप संजय राऊत यांनी केला होता. त्या प्रकरणी समन्स बजावण्यात आलं आहे. आम्ही कोर्टात काय उत्तर द्यायचं ते देऊ असं आता संजय राऊत यांनी म्हटलं आहे.