PM Modi Slams Pakistan From China On Pahalgam Attack: चीनच्या तिआनजिन शहरात २५ वी शांघाय सहकार्य परिषद होत आहे. या परिषदेसाठी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यासह अनेक देशांचे प्रमुख उपस्थित आहेत. या परिषदेत आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण झाले. यामध्ये त्यांनी पहलगाम दहशतवादी हल्ला आणि दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या पाकिस्तानवर नाव न घेता जोरदार टीका केली. पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला फटकारले तेव्हा पाकिस्तानचे पंतप्रधान शबबाज शरीफदेखील उपस्थित होते.

भारताच्या आत्मा…

पंतप्रधान मोदी म्हणाले की, “पहलगाम दहशतवादी हल्ला हा केवळ भारताच्या आत्मा असलेल्या जम्मू आणि काश्मीरवरच हल्ला नव्हता तर मानवतेवर विश्वास ठेवणाऱ्या सर्व देशांना एक उघड आव्हान होते. मी एक गंभीर प्रश्न उपस्थित करतो, दहशतवादाला उघडपणे पाठिंबा देणारा देश आपल्यापैकी कोणालाही स्वीकारार्ह वाटेल का? आपण सर्वांनी सर्व प्रकारच्या दहशतवादाशी लढले पाहिजे आणि त्याचा विरोध केला पाहिजे. मानवतेप्रती ही आपली जबाबदारी आहे.”

४ दशकांपासून भारत दहशतवादाचा फटका

दहशतवादाबद्दल बोलताना पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की, “यावर्षी भारताने संयुक्त माहिती अभियानांचे नेतृत्व करून दहशतवादी संघटनांविरुद्ध लढण्यासाठी पुढाकार घेतला आहे. दहशतवादाच्या वित्तपुरवठ्याविरुद्ध आवाज उठवला गेला आहे. तुमच्या या पाठिंब्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो. गेल्या ४ दशकांपासून भारत दहशतवादाचा फटका सहन करत आहे. त्यामुळे अनेकांनी जीव गमावले आहेत. यासह अनेक मुले अनाथ झाली आहेत. अलिकडेच, पहलगाममध्ये आपण दहशतवादाचे एक अतिशय घृणास्पद रूप पाहिले आहे. या दुःखाच्या वेळी आमच्यासोबत उभ्या राहिलेल्या मित्र राष्ट्रांचे मी आभार मानतो.”

आपला मुद्दा पुढे नेत मोदी म्हणाले की, “दहशतवाद आणि फुटीरतावाद ही मोठी आव्हाने आहेत. दहशतवाद हे संपूर्ण मानवतेसाठी एक मोठे आव्हान आहे. कोणताही देश, कोणताही समाज त्यापासून स्वतःला सुरक्षित मानू शकत नाही, म्हणून भारताने दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एकतेवर भर दिला आहे. यामध्ये एससीओनेही मोठी भूमिका बजावली आहे.”

दरम्यान या भाषणापूर्वी पंतप्रधान मोदी यांनी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जीनपिंग आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्या भेट घेतली. या भेटीचे फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. यावेळी पंतप्रधान मोदींनी पुतिन यांची गळाफेट घेतल्याचेही पाहायला मिळाले.