अमेरिकेतील राजनैतिक अधिकारी देवयानी खोब्रागडे यांच्यावर अटकेची कारवाई केल्याच्या विरोधात भारताने अमेरिकी राजनैतिक अधिकाऱ्यांचे विशेषाधिकार काढून घेतल्याचा पहिला फटका राजदूत नॅन्सी पॉवेल यांना बसला असून त्यांना नेपाळ दौरा रद्द करावा लागला. पॉवेल यांनी भारत सरकारला नेपाळ भेटीची कल्पना दिली होती पण विमानतळ पास सरकारने काढून घेतलेला असल्याने त्यांना नेपाळ दौरा रद्द करणे भाग पडले.
केवळ राजदूतांना विमानतळावर दाखवण्यासाठी फोटो पास दिला जातो, ते ओळखपत्र असते व त्यावर संबंधित व्यक्तीचे छायाचित्रही असते व इतर ओळखपत्रे राजनैतिक अधिकाऱ्यांना गरजेनुसार दिली जात असतात. नॅन्सी पॉवेल यांनी भारतीय परराष्ट्र खात्याकडे माहिती मागितली असता त्यांचे विशेषाधिकार १९ डिसेंबरलाच काढून घेतल्याचे सांगण्यात आले.
भारताने केलेली कृती ही जशास तसे स्वरूपाची असून आता भारतीय राजदूत जेव्हा अमेरिकेत किंवा तेथून बाहेरच्या देशात जातात तेव्हा त्यांना विशेषाधिकार दिले जात नाहीत. माजी राजदूत मीरा शंकर यांना २०१० मध्ये अमेरिकेतील विमानतळावर सुरक्षा एंजटांनी रांगेतून बाहेर काढून तपासणी करून वाईट वागणूक दिली होती. अमेरिकी दूतावासाने त्यांच्याकडे काम करणाऱ्या भारतीय कर्मचाऱ्यांना नेमके किती वेतन दिले जाते याची माहिती दिलेली नाही.
दिल्ली व चेन्नईतील अमेरिकी शाळामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना किती वेतन दिले जाते हे सांगितलेले नाही. आमचे कर्मचारी ख्रिसमसच्या सुटीवर असल्याने ही माहिती देण्यास पुरेसा वेळ द्यावा अशी विनंती अमेरिकी दूतावासाने केली आहे.