“मोदी सरकारने भविष्यासाठी…”; कृषी कायदे मागे घेण्याच्या घोषणेनंतर सोनिया गांधींचा हल्लाबोल

सोनिया गांधींनी हा शेतकऱ्यांचा विजय आणि सरकारच्या अहंकाराचा पराभव असल्याचे म्हटले आहे.

sonia gandhi on narendra modi

केंद्र सरकारने आणलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात गेल्या वर्षभरापासून आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना आज (शुक्रवार) दिलासा मिळाला आहे. काही शेतकऱ्यांना या कायद्यांचे फायदे समजावून सांगण्यात आम्ही यशस्वी न झाल्याने हे तीनही कायदे मागे घेत असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. दरम्यान काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी हा शेतकऱ्यांच्या बलिदानाचा विजय असल्याचे म्हटले आहे. सोनिया म्हणाल्या की, ७०० हून अधिक शेतकरी कुटुंबातील सदस्यांनी न्यायाच्या या लढ्यात बलिदान दिले आहे. आज त्यांचे बलिदान सार्थकी लागले आहे. आज सत्य, न्याय आणि अहिंसेचा विजय झाला आहे.

लोकशाहीत कोणताही निर्णय प्रत्येक संबंधितांशी सल्लामसलत करून आणि विरोधकांशी सल्लामसलत करून घ्यावा, असे सोनिया गांधी म्हणाल्या. मला आशा आहे की मोदी सरकारने भविष्यासाठी काहीतरी धडा शिकला असेल, असा टोला देखील सोनिया गांधी यांनी लगावला. 

सोनिया गांधींनी हा शेतकऱ्यांचा विजय आणि सरकारच्या अहंकाराचा पराभव असल्याचे म्हटले आहे. या निर्णयावर आनंद व्यक्त करताना सोनिया गांधी म्हणाल्या, गांधीवादी आंदोलनाच्या तब्बल १२ महिन्यांनंतर आज देशातील ६२ कोटी अन्नदाते-शेतकरी-शेतमजुरांच्या संघर्षाचा आणि इच्छाशक्तीचा विजय झाला आहे.

केंद्र सरकारवर हल्लाबोल करताना सोनिया गांधी म्हणाल्या, “आज सत्तेत असलेल्या लोकांनी शेतकऱ्यांविरोधात रचलेलं षडयंत्रही पराभूत झालं आणि हुकूमशाही राज्यकर्त्यांचा अहंकार देखील. आज रोजीरोटी आणि शेतीवर हल्ला करण्याचा कटही फसला. आज तिन्ही काळे शेतीविरोधी कायदे पराभूत झाले आणि अन्नदाता जिंकला.”

काँग्रेस उद्या म्हणजेच २० नोव्हेंबर रोजी देशभरात ‘किसान विजय दिवस’ साजरा करणार आहे. हे पाहता, सरकारच्या निर्णयाविरुद्ध शेतकऱ्यांच्या चिकाटी आणि उत्साही लढ्याला सलाम करण्यासाठी राज्य घटकांना किसान विजय रॅली किंवा किसान विजय सभा आयोजित करण्यास सांगण्यात आले आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Withdrawal of agricultural laws sonia gandhi criticism of narendra modi srk

ताज्या बातम्या