दोनच दिवसांपूर्वी पश्चिम बंगालमध्ये एका जोडप्याला विवाहबाह्य संबंधांच्या संशयावरून बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना घडली होती. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला होता. आता पुन्हा एकदा तशीच एक घटना पश्चिम बंगालमध्ये समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, या प्रकरणातील मारहाण झालेल्या महिलेने आत्महत्या केल्याचा आरोप तिच्या पतीने केला आहे. या प्रकरणात पोलिसांनी तपास सुरू केला असून अशा घटनांबाबत काळजी व्यक्त केली जात आहे.

नेमकं काय घडलंय?

पश्चिम बंगालच्या जलपैगुडी जिल्ह्यातील फुलबारी गावात २९ जून रोजी एका महिलेने आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. या महिलेच्या पतीने पोलिसांत तक्रार केल्यानंतर यासंदर्भात चर्चा सुरू झाली आहे. सदर महिलेचे विवाहबाह्य संबंध असल्याचा दावा करत तिला मारहाण झाल्याचं प्रत्यक्षदर्शींचं म्हणणं आहे.

महिलेच्या पतीचा गंभीर आरोप

या महिलेच्या पतीने मारहाणीनंतर आलेल्या मानसिक दडपणातून तिने आत्महत्या केल्याचा आरोप केला आहे. “माझ्या पत्नीने विष पिऊन आत्महत्या केली. काही गावकऱ्यांनी तिला पंचायतीच्या समोरच मारहाण केली. मी त्यासंदर्भात पोलिसात त्यासंदर्भात तक्रार केली आहे. मी त्यांना सांगितलंय की माझ्या पत्नीला गावातील महिलांनी पंचायतीसमोर बोलवून मारहाण केल्याचा धक्का सहन झाला नाही. त्या दबावात तिने आत्महत्या केली आहे”, असं या व्यक्तीने इंडियन एक्स्प्रेसला सांगितलं.

या प्रकरणातही तृणमूलच्या नेत्यांचा सहभाग?

सदर महिलेचे गावातीलच एका तरुणाशी विवाहबाह्य संबंध असल्याचा आरोप करण्यात येत आहे. गेल्या १० दिवसांपासून ती बेपत्ता असून तिच्या पतीनेच ती बेपत्ता असल्याची तक्रारही दाखल केली होती. मात्र, २९ जून रोजी तिचा ठावठिकाणा समजला आणि त्या महिलेला पुन्हा गावात बोलावण्यात आलं. “माझी पत्नी गावात परतल्यानंतर तिला पंचायत प्रमुखांनी पाचारण केलं. त्यांच्यासोबत तृणमूल काँग्रेसच्या नेत्या मालती रॉय आणि त्यांचे पती शंकर रॉय हेही होते. जेव्हा आम्ही तिथे पोहोचलो, तेव्हा त्यांच्या कार्यकर्त्यांनी मला व माझ्या पत्नीला मारहाण करायला सुरुवात केली”, असं या महिलेच्या पतीने सांगितलं आहे. दोन दिवसांपूर्वी समोर आलेल्या मारहाणीच्या प्रकरणातही तृणमूलच्या नेत्यांचा सहभाग असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

पश्चिम बंगालमध्ये विवाहबाह्य संबंधाच्या संशयावरून जोडप्याला बेदम मारहाण, रस्त्यावरील ‘त्या’ कृत्यामुळे विरोधकांसह सत्ताधाऱ्यांचाही संताप!

तृणमूलच्या नेत्यांनी आरोप फेटाळले!

मालती रॉय आणि शंकर रॉय यांनी आरोप फेटाळले आहेत. “आम्ही पोलिसांत तक्रार दाखल करणार होतो. पण त्याऐवजी आम्ही पंचायतीकडे आलो. सदर महिला याआधीही एकदा एका तरुणासोबत पळून गेली होती. कदाचित त्यामुळे त्यांच्या शेजाऱ्यांनी या महिलेला बोलवून तिला मारहाण केली असेल. आम्ही तर तिथे उपस्थितही नव्हतो. मी तिथे पोहोचलो तेव्हा तिथे बैठक चालू होती. त्यावेळी सदर महिला म्हणाली की तिला स्वच्छतागृहात जायचं आहे. काही वेळाने आम्हाला समजलं की या महिलेनं अॅसिड पिऊन आत्महत्या केली”, असं शंकर रॉय यांनी सांगितलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, या प्रकरणी दाखल तक्रारीवरून पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे. या प्रकरणावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. राज्यातील विरोधी पक्षात असणाऱ्या भारतीय जनता पक्षाकडून सत्ताधारी तृणमूल काँग्रेसला लक्ष्य केलं जात आहे.