Linkedin Post Woman Denied Job For Having Children: दिल्लीतील एका महिला मार्केटिंग प्रोफेशनलने लिंक्डइनवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने दावा केला आहे की, तिला लहान मुले असल्यामुळे मुख्य मार्केटिंग ऑफिसर पदासाठी नाकारण्यात आले होते. या पोस्टनंतर सोशल मीडियावर याबाबत मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू झाली आहे.
या महिलेने मुलाखतीनंतर कंपनीच्या एचआरशी झालेल्या संभाषणाचा स्क्रीनशॉट देखील शेअर केला आहे. या स्क्रीनशॉटमध्ये एचआरने कबूल केले आहे की, तिला नोकरी नाकारण्याचे एक कारण म्हणजे तिला असलेली लहान मुले होती.
व्हायरल झालेल्या एका पोस्टमध्ये, प्रज्ञा यांनी एका ग्राहक ब्रँडच्या प्रमोटरसोबतच्या १४ मिनिटांच्या मुलाखतीनंतर त्यांची कशी निराशा झाली याचे तपशीलवार वर्णन केले आहे. त्यांच्या लिंक्डइन पोस्टनुसार, त्यांनी पहिली ११ मिनिटे त्यांच्या ११ वर्षांच्या कारकिर्दीचा सारांश दिला आणि उर्वरित तीन मिनिटांत त्यांना विचारण्यात आलेले प्रश्न फक्त वैयक्तिक होते.
“मुलांचे वय काय? ते कोणत्या शाळेत जातात?”
व्यावसायिक कामगिरीबद्दल विचारण्याऐवजी, मुलाखत घेणाऱ्या ब्रँड प्रमोटरला त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातच अधिक रस असल्याचे दिसून आले. प्रज्ञा यांच्या मते, प्रमोटरने त्यांना विचारलेल्या प्रश्नांमध्ये, त्यांच्या कुटुंबातील सदस्यांची संख्या, त्यांच्या मुलांचे वय, ते कोणत्या शाळेत जातात, त्यांच्या अनुपस्थितीत त्यांची काळजी कोण घेईल, ऑफिसला येण्यासाठी-जाण्यासाठी त्या कशी योजना आखत होत्या (दिल्ली ते गुडगाव), पती काय करतो? अशा प्रकारच्या प्रश्नांचा समावेश होता.
नोकरी मिळणार नाही, हे माहित होते…
“आणि बस्स… माझ्या अनुभवाबद्दल, मी हाताळलेल्या उत्पन्नाबद्दल, मी वाढवलेल्या व्यवसायांबद्दल, मी काम केलेल्या उद्योगांबद्दल, माझ्या कामगिरीबद्दल, माझ्या अपयशांबद्दल, मी ज्या आव्हानात्मक प्रकल्पांवर काम केले आहे किंवा मी आतापर्यंत केलेल्या आश्चर्यकारक कामांबद्दल कोणतेही प्रश्न विचारले नाहीत. माझ्या बलस्थानांबद्दल आणि कमकुवतपणाबद्दलही नाही!”, असे प्रज्ञा यांनी पोस्टमध्ये लिहिले आहे. त्या पुढे म्हणाल्या, की यानंतर त्यांना लगेचच कल्पना आली होती की, नोकरी मिळणार नाही.
तुमची मुले खूप लहान आहेत
मुलाखतीच्या दुसऱ्या दिवशी, प्रज्ञा यांनी एचआरकडे पाठपुरावा केला, पण त्यांना नकार देण्यात आला. जेव्हा त्यांनी अभिप्राय विचारला, तेव्हा त्यांना सांगण्यात आले की, नोकरी नाकारण्यामागे कारण म्हणजे “तुमची मुले खूप लहान आहेत.”
प्रज्ञा यांनी त्यांच्या पोस्टच्या शेवटी असे अधोरेखित केले की, गेल्या तीन महिन्यांत स्टार्टअप्स आणि लेगसी फर्म्समध्ये त्यांनी ज्या वरिष्ठ नेतृत्व भूमिका बजावल्या आहेत, त्या अजूनही पुरुषप्रधान आहेत.