कर्नाटकातल्या बंगळुरुमध्ये एक अशी घटना समोर आली आहे ज्यामुळे पोलीसही चक्रावून गेले आहेत. हे प्रकरण एका नवविवाहित जोडप्याशी संबंधित आहे. मधुचंद्राच्या रात्री पतीने शरीर संबंध ठेवले नाहीत या कारणामुळे पत्नीने दोन कोटींची भरपाई मागितली आहे. माझा नवरा नपुंसक आहे त्यामुळे मला दोन कोटींची भरपाई दिली जावी असं या महिलेने म्हटलं आहे. तर या प्रकरणात पतीने त्याची पत्नी तिच्या माहेरचे लोक यांच्यावर मारहाण आणि धमक्या दिल्याचे तसंच माझी संपत्ती हडप करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप केला आहे.
५ मे रोजी झालं लग्न
समोर आलेल्या माहितीनुसार बंगळुरुमधला रहिवासी प्रवीण याचं लग्न एका तरुणीशी झालं. ५ मे २०२५ रोजी हा विवाह सोहळा पार पडला. हिंदू रिती रिवाजांप्रमाणेच प्रवीणचं लग्न त्याच्या गावातच पार पडलं. त्यानंतर बंगळुरुच्या सप्तगिरी पॅलेस या ठिकाणी लग्नाचं रिसेप्शनही ठेवण्यात आलं. ज्याचा संपूर्ण खर्च प्रवीण आणि त्याच्या कुटुंबाने केला होता. रिसेप्शननंतर प्रवीणच्या पत्नीचा गृहप्रवेश झाला. ती सात दिवस सासरी राहिली.
१६ मे रोजी काय घडलं?
१६ मे रोजी प्रवीणच्या मावशीच्या घरी त्यांच्या लग्नानंतर ‘सुहागरात’ होती. त्यावेळी शारिरीक आणि मानसिक तणाव असल्याने दोघांमध्ये शरीरसंबंध प्रस्थापित झाले नाहीत. यानंतर प्रवीणच्या पत्नीने त्याच्याशी वाद आणि भांडण करण्यास सुरुवात केली. त्याला टोमणे मारणं, शिव्या देणं हे प्रकार तिने सुरु केलं. एवढंच नाही तर पती नपुंसक आहे असंही ती म्ङणाली. १९ मे रोजी प्रवीणची पत्नी तिच्या माहेरी तिच्या काकांच्या घरी निघून गेली. त्यानंतर तिथेही तिने हाच मुद्दा उपस्थित केला. माझा पती प्रवीण नपुंसक आहे आणि मला दोन कोटींची भरपाई हवी आहे असं ती म्हणू लागली. एनडीटीव्हीने हे वृत्त दिलं आहे.
२१ मे रोजी काय घडलं?
२१ मे रोजी विवाहित तरुणीच्या घरातले लोक प्रवीणच्या घरी पोहचले. तिथे त्यांनी शिवीगाळ करत तमाशआ केला. २४ मे रोजी अपोलो रुग्णालयात प्रवीणची मेडिकल चाचणी करण्यात आली. प्रवीणमध्ये वैद्यकीय दृष्ट्या कुठलाही दोष नाही, शरीरसंबंध प्रस्थापित करण्यात काहीही अडचण येणार नाही असं डॉक्टरांनी सांगितलं. त्याच्यावर मानसिक ताण असल्याने थोडा वेळ जावा लागेल असंही डॉक्टरांनी सांगितलं. तरीही प्रवीणच्या पत्नीचं समाधान झालं नाही. तिने तिच्या माहेरच्या मंडळींसह प्रवीणवर दबाव आणण्यास सुरुवात केली. ५ जूनला तिच्या कुटुंबतले १५ ते २० जण प्रवीणच्या घरी पोहचले होते.
प्रवीणचा आरोप नेमका काय?
दरम्यान प्रवीणने या सगळ्यात आरोप केला आहे की पत्नीच्या माहेरच्या मंडळींनी त्याला आणि त्याच्या कुटुंबाला मारहाण केली, शिवीगाळ केली. त्यानंतर पंचायत बसवून दोन कोटी रुपयांची भरपाई मागितली. १९ जूनला पत्नीने घर सोडलं पण तिने माझी बदनामीच सुरु ठेवली. त्यानंतर १७ ऑगस्टला म्हणजेच मागच्या महिन्यात मी जेव्हा मंदिरात जाऊन घरी आलो तेव्हा माझी पत्नी तिच्या कुटुंबातील सदस्यांसह माझ्या घराच्या बाहेर होती. त्यावेळी त्यांच्याकडे शस्त्रंही होती. तिने आणि तिच्या कुटुंबातील सदस्यांनी हल्ला केला असा आरोपही प्रवीणने केला.
कोर्टाच्या आदेशानंतर गुन्हा दाखल
दरम्यान या हल्ल्यात प्रवीणच्या डोक्याला दुखापत झाली. हे सगळं प्रकरण सीसीटीव्हीत कैद झालं. ज्यानंतर प्रवीण आणि त्याच्या कुटुंबाने पोलिसात धाव घेतली. कोर्टाचा दरवाजाही ठोठावला. कोर्टाच्या आदेशानंतर या प्रकरणात FIR दाखल करण्यात आली आहे. प्रवीणचा आरोप हा आहे की त्याच्या पत्नीने आणि तिच्या माहेरच्या लोकांनी मानसिक छळ केला. तसंच ठार मारण्याचा प्रयत्न केला. तसंच दोन कोटी रुपये उकळण्यासाठीच हे सगळं केलं. या प्रकरणी गोविंदराज पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणी पुढील तपास सुरु केला आहे.