Crime News : हरियाणामधील फरीदाबाद येथे एका वर्दळीच्या रस्त्यावरील १० फूट खोल खड्ड्यातून एका महिलेचा कुजलेला मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. जेसीबी मशीनचा वापर करून हा मृतदेह खोदून बाहेर काढावा लागला. मिळालेल्या माहितीनुसार, हा मृतदेह तनु नावाच्या २४ वर्षीय महिलेचा असून ती उत्तर प्रदेशच्या शिकोहाबाद येथील राहिवासी आहे. तिचे लग्न अवघ्या दोन वर्षांपूर्वी फरीदाबादच्या रोशन नगर येथील अरूण नावाच्या व्यक्तीबरोबर झाले होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तनुच्या सासरकडील कुटुंबातील चार सदस्य, तिचा पती, सासरे, सासू आणि आणखी एक जवळचा नातेवाईक यांना याप्रकरणी ताब्यात घेण्यात आले आहेत.

तनु तिच्या पती आणि त्याच्या कुटुंबासह राहत असलेल्या घराशेजारील एका सार्वजनिक गल्लीत नव्याने बांधण्यात आलेल्या काँक्रीटखाली हा मृतदेह आढळून आला आहे. दरम्यान त्यांच्या शेजार्‍यांनी पोलिसांना सांगितले की, सांडपाण्यासाठी गटार बांधण्यासाठी सुमारे दोन महिन्यांपूर्वी हा भाग खोदण्यात आला होता.

दरम्यान सकाळी ८ च्या सुमारास हा मृतदेह खोदून बाहेर काढण्यात आला, त्यानंतर मृत्यूचे वेळ आणि कारण शोधण्यासाठी तो फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे.

तनुची बहीण प्रीतीने आरोप केला आहे की २०२३ साली लग्न झाल्यापासून तिच्या बहि‍णीचा मानसिक आणि शारीरिक छळ करण्यात आला. प्रीतीने आरोप केला की अरूण आणि त्याचे कुटुंबिय लग्न पार पडल्यापासून सोन्याच्या दागिन्यांची आणि पैशांची मागणी करत होते. तिने सांगितले की तनुच्या कुटुंबियांनी त्यांच्या मागण्या शक्य तेवढ्या प्रमाणात पूर्ण करण्याचा प्रयत्न केला पण तरी त्याच्यावर सतत दबाव टाकण्यात आला.

“लग्नानंतर काही महिन्यांनीच तिला चांगली वागणूक मिळत नसल्याने तनु माहेरी राहायला आली,” असे प्रीतीने माध्यमांना सांगितले. “ती एक वर्षापेक्षा जास्त काळ आमच्यासोबत राहिली. शेवटी आम्ही तिला परत पाठवले तेव्हा छळ पुन्हा सुरू झाला. ते तिला अगदी फोनवरही आमच्याशी बोलू देत नव्हते.” इतकेच नाही तर २३ एप्रिल रोजी सासरच्यांनी तनु घरातून पळून गेल्याचे कुटुंबाला सांगितले, असा आरोपही प्रीतीने केला.

तिने पुढे बोलताना सांगितले की, तिचा संशय तेव्हा बळावला जेव्हा तिने ९ एप्रिल रोजी बहिणीला कॉल करण्याचा प्रयत्न केला आणि फोन लागला नाही. त्यानंतर कुटुंबियांनी पोलिसांकडे धाव धेतली. प्रीतीने दावा केला की अनेक आठवडे पोलिसांकडून कोणतीही गंभीर कारवाई करण्यात आली नाही.

स्थानिक रहिवाशांनी पोलिसांना सांगितले की तनुच्या सासऱ्याने घरासाठी चांगली ड्रेनेज व्यवस्था नसल्याचे सांगत एप्रिल महिन्यात हा खड्डा खणला होता. तसेच शेजाऱ्यांनी सांगितले की हा खड्डा ताबडतोब बुजवून टाकण्यात आला आणि त्यावर सिमेंटचा स्लॅबचे अवरण देखील टाकण्यात आला.

“खड्डा खाणताना सर्व शेजार्‍यांनी पाहिलं. त्यांनी सांगितलं की तो घाण पाण्यासाठी आहे. त्यानंतर त्यांची सून दिसली नाही. काही जणांना वाटलं की काहीतरी गडबड आहे, पण कोणीही याची कल्पना केली नव्हती,” असे एका शेजाऱ्याने सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पोलिस उपायुक्त (मध्य) उषा कुंडू यांनी एका आठवड्यापूर्वी औपचारिक तक्रार मिळाली असल्याची पुष्टी केली. “आठवड्यापूर्वी तक्रार मिळाल्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई केली. खड्ड्यातून मृतदेह बाहेर काढण्यात आला असून चार जणांना ताब्यात घेण्यात आले आहे आणि त्यांची चौकशी सुरू आहे. या प्रकरणाचा सखोल तपास केली जात आहे,” असेही त्या म्हणाल्या.