महिला एकाचवेळी जास्त कामे करू शकतात पण पुरूष ती करू शकत नाहीत, हा समज खोटा असल्याचा निष्कर्ष अलिकडच्या संशोधनातून काढण्यात आला आहे.  वॉरविक बिझीनेस स्कूलचे निक चॅटर यांनी त्यांच्या ‘द ह्य़मून झू’ या ‘बीबीसी रेडिओ फोर’ वरील सहा भागांच्या मालिकेत म्हटले आहे की, स्त्री किंवा पुरूष यांच्यापैकी कुणीच एकावेळी जास्त कामे करण्यात वाकबगार नसते. वर्तनाशास्त्राचे प्राध्यापक असलेले निक चॅटर यांनी सांगितले की, माणूस सरावाने एकावेळी दोन गोष्टी करू शकतो; त्यात गाडी चालवणे व बोलणे यासारख्या बाबींचा समावेश आहे. पण जेव्हा सवयीची गोष्ट नसेल तेव्हा मल्टीटास्किंग म्हणजे एकावेळी अनेक कामे करणे शक्य नसते. ज्या आव्हानात्मक गोष्टी असतात त्यात आपण एकावेळी एकच गोष्ट करू शकतो. आपण मल्टीटास्किंग करतो असे आपल्याला वाटते पण ते खोटे आहे. आपण एक गोष्ट अर्धवट थांबवून दुसरी गोष्ट करीत असतो. जर आपल्याला मल्टिटास्किंगचा सराव असेल तर असे खरेतर व्हायला नको.
आपण एखाद्या गोष्टीत वाकबगार असू तर त्याला मानसिक ताण पडत नाही. जसे गाडी चालवणे व रेडिओ ऐकणे आपण एकावेळी करू शकतो. जेव्हा तुम्ही तुमच्या स्मृतीला ताण देऊ लागता तेव्हा किंवा एखादी अवघड गोष्ट करायला पाहता त्यावेळी तुम्हाला दुसरे एखादे काम थांबवून मगच नवीन कामाकडे वळावे लागते. मानसिक व शारीरिक ऊर्जा आपण समजतो त्यापेक्षा एकमेकांशी फारच निगडित असतात. मानसिक प्रक्रिया आपण एकमेकांपासून अलग ठेवू शकत नाही. जर आपण नैमित्तिक रोजची कामे करीत असू तर ठीक आहे, पण त्यापेक्षा वेगळे काम करीत असू तर मेंदूच्या इतर भागांनाही कार्यान्वित व्हावे लागते व चालण्यासारख्या नेहमीच्या बाबीतही हस्तक्षेप करावा लागतो, असे ते म्हणाले.