“वय वाढत चाललं आहे, लग्न होत नाही. नोकरी आहे, जमीनजुमला आहे, तरीही लग्न होत नाही”, अशी खंत ४५ वर्षीय व्यक्तीने कथावाचक अनिरुद्धाचार्य यांच्याकडे व्यक्त केली. या संवादाचा व्हिडीओ व्हायरल झाला. यानंतर सुरू झाला एका गंभीर गुन्ह्याचा प्रवास. जबलपूरमधील इंद्रकुमार तिवारी यांचं लग्न होत नसल्याचं हेरून उत्तर प्रदेशमधील एका टोळीनं त्यांना सोशल मीडियावरून जाळ्यात ओढलं. खोटं लग्न करून त्यांच्याकडील मुद्देमाला लुटला आणि तिवारी यांचा खून केला. तब्बल महिन्याभराने या गुन्ह्याची उकल करण्यात जबलपूर पोलिसांना यश आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इंद्रकुमार तिवारी यांचा लग्नासंबंधी प्रश्न विचारणारा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आरोपींनी त्यांच्याशी संपर्क साधला. साहिबा बानो या मुलीचे खोटे कागदपत्र तयार करून तिचे नाव खुशी तिवारी असल्याचे भासवले आणि इंद्रकुमार यांना लग्नासाठी उत्तर प्रदेशच्या कुशीनगर येथे बोलावले.
इंद्रकुमार जबलपूर येथील राहणारे होते. त्यांच्या आई-वडिलांचे निधन झालेले असून त्यांचे जवळचे नातेवाईक नाहीत. ते शाळेत शिक्षक असून नोकरीबरोबर शेतीही करतात. ३० मे रोजी कुशीनगर येथे लग्नासाठी जात असल्याचे त्यांनी शेजारीपाजारी आणि दुरच्या नातेवाईकांना कळवले होते.
लग्न करण्यासाठी इंद्रकुमार यांनी एक एकर जमीन गहाण ठेवली. त्यातून त्यांनी होणाऱ्या पत्नीसाठी दागिने विकत घेतले, तसेच दीड लाख रुपयांची रोकड घेऊन ते कुशीनगर येथे पोहोचले. तिथे गेल्यानंतर ५ जून पर्यंत ते मित्रांच्या संपर्कात होते. त्यानंतर त्यांचा फोन स्विच ऑफ झाला.
इंद्रकुमार यांचा फोन लागत नसल्यामुळे जबलपूरमधील त्यांचे मित्र आणि दुरच्या नातेवाईकांना संशय आला. तीन दिवस वाट पाहिल्यानंतर ८ जून रोजी त्यांनी जबलपूरच्या पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी इंद्रकुमार यांचा फोन ट्रॅक करत पुढील तपास सुरू केला. तसेच इंद्रकुमार यांचा फोटो कुशीनगर येथील पोलीस ठाण्यात पाठवून माहिती देण्याची विनंती केली.
१९ दिवसांनी आढळला मृतदेह
२७ जून रोजी कुशीनगर येथील उपासपूर गावात एक अज्ञात मृतदेह सापडल्याची माहिती जबलपूर पोलिसांना देण्यात आली. जबलपूर पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटवली असता तेच इंद्रकुमार असल्याचे लक्षात आले. मात्र इंद्रकुमार यांच्याकडील दागिने, पैसे आणि त्यांचा मोबाइल आढळून आला नाही. यामुळे हा हत्येचा प्रकार असल्याचा संशय पोलिसांना आला.
जबलपूरमधील मझौली पोलीस ठाण्याचे प्रमुख जेपी द्विवेदी यांनी सखोल तपास करत कौशल गौड नामक आरोपीला कुशीनगर येथून अटक केली आहे. तसेच इतर आरोपींचा शोध सुरू आहे. खुशी तिवारी नावाने लग्नाचं आमिष दाखविणारी साहिबा बानोही फरार असून पोलीस तिचा शोध घेत आहेत.
या प्रश्नोत्तरातील व्हिडीओ व्हायरल झाला
दरम्यान इंद्रकुमार तिवारी यांच्या हत्येनंतर त्यांच्या गावात हळहळ व्यक्त होत आहे. इंद्रकुमार यांच्या आई-वडिलांचे अनेक वर्षांपूर्वी निधन झाले होते. भाऊ-बहीणही नसल्यामुळे त्यांना एकटे वाटायचे. म्हणूनच लग्न होण्यासाठी ते काही वर्षांपासून प्रयत्न करत होते. ते अतिशय शांत स्वभावाचे सज्जन गृहस्थ होते, असेही ग्रामस्थांनी सांगितले.