scorecardresearch

ओमायक्रॉनच्या वाढत्या धोक्यादरम्यान WHO कडून आली दिलासादायक बातमी; म्हणाले,…

जास्तीत जास्त लोकांनी लवकरात लवकर करोना प्रतिबंधक लस टोचून घ्यायला हवी, असं आवाहनही जागतिक आरोग्य संघटनेने केलं आहे.

Omicron new coronavirus variant deltacron emerges in Cyprus
(प्रातिनिधिक छायाचित्र)

जगभरात करोनाच्या तिसऱ्या लाटेचा कहर सध्या सुरू आहे. भारतासह अनेक देशांमध्ये करोनाची रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. करोनाचा नवा ओमायक्रॉन व्हेरिएंट हा डेल्टा इतका घातक नसला तरी तो खूप वेगाने पसरत असल्याचं आढळून आलं आहे. या सगळ्या दरम्यान जागतिक आरोग्य संघटनेने एक चांगली बातमी दिली आहे. आफ्रिकेत करोनाची चौथी लाट ओसरत असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेचं म्हणणं आहे. त्यामुळे करोना प्रसाराचा वेग कमी होत असल्याचं संघटनेचं म्हणणं आहे.

आफ्रिकेत करोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटमुळे आलेली चौथी लाट गेल्या सहा आठवड्यांपासून अधिक तीव्र झाली होती. मात्र ती आता कमी होत असल्याचं दिसून येत आहे. ११ जानेवारीपर्यंत आफ्रिकेत १० दशलक्षाहून अधिक करोना रुग्ण आढळले. तर करोना रुग्णांच्या संख्येत गेल्या एका आठवड्यात १४ टक्क्यांची घट झाली आहे. जिथे ओमायक्रॉनचे रुग्ण सर्वात आधी आढळले त्या दक्षिण आफ्रिकेतही दर आठवड्याला आढळणाऱ्या रुग्णसंख्येत ९ टक्क्यांची घट झाली आहे. पूर्व आणि मध्य आफ्रिकी परिसरातही घट नोंदवण्यात आली आहे. मात्र उत्तर आणि पश्चिमी आफ्रिकेत मात्र अजूनही करोना रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. उत्तर आफ्रिकेतल्या रुग्ण संख्येत गेल्या आठवड्यात १२ ते २१ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आल्याचं आजतकने दिलेल्या वृत्तात नमूद करण्यात आलं आहे.

आफ्रिकेचे जागतिक आरोग्य संघटनेचे डॉ. मत्शिदिसो मोएती म्हणाले की, प्राथमिक संकेत असं सांगतात की देशातली चौथी लाट ही वेगवान असली तर ती आता कमी होत आहे. मात्र यात अस्थिरता दिसून येते. त्यामुळे करोनाशी लढण्यासाठी ज्या उपायांची गरज आहे, त्या उपायांचं अवलंब अजूनही केलाच पाहिजे. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी लवकरात लवकर करोना प्रतिबंधक लस टोचून घ्यायला हवी.

तर WHO चे प्रमुख टेड्रोस एडनॉम घेब्रेयिसस यांनीही काही दिवसांपूर्वी आफ्रिकेतल्या लसीकरणाविषयी चिंता व्यक्त केली होती. देशातल्या ८५ टक्क्यांहून अधिक लोकांनी करोना प्रतिबंधक लस घेतलेली नसल्याची माहिती त्यांनी दिली.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: World health organization who on omicron corona in africa vsk

ताज्या बातम्या