जागतिक हवामान संस्था ( World Meteorological Organization ) यांनी २०२० वर्षासाठीचा जागतिक हवामानातील बदलांचा आढावा घेणार अहवाल प्रकाशित केला आहे. यामध्ये जागतिक पातळीवर तापमानात झालेली वाढ, हरितगृह वायुंचे वाढलेले प्रमाण आणि यामुळे जगावर झालेले परिणाम याबाबत भाष्य केलं आहे. यामध्ये आशियामध्ये झालेल्या घडामोडींचा विशेष उल्लेख केला आहे. जागतिक हवामानातील बदलामुळे नैसर्गिक आपत्तींचा सर्वाधिक फटका हा आशियातील देशांना बसल्याचं अहवालात नमूद केलं आहे.

जागतिक हवामान संस्थेच्या अहवालानुसार जागतिक पातळीवर झालेल्या हवामानातील बदलांचा सर्वात मोठा फटका हा चीन आणि भारताला बसला आहे. विविध स्वरूपाची चक्रीवादळ, अतिवृष्टी, यामुळे उद्भवलेली पूर परिस्थिती, याविरोधातील परिस्थिती म्हणजे दुष्काळ यामुळे जगात विशेषतः आशियाला २०२० मध्ये अक्षरशः झोडपून काढले. यामुळे पिकांचे तसंच मालमत्तेचे झालेले नुकसान झाले, अनेकांचे बळी गेले. भारताला मोठा फटका बसला. जागतिक हवामान संस्थेच्या अहवालानुसार भारताला २०२० मध्ये अंदाजे ८७ अब्ज डॉलर्सचा म्हणजेच सुमारे ६५,३५२ कोटी रुपयांचा फटका बसला आहे. तर सर्वाधिक फटका हा चीनला सुमारे २३७ अब्ज डॉलर्सचा बसला आहे. जपानला ८३, दक्षिण कोरियाला २४, पाकिस्तानला १५ तर थायलंडला १२, बांगलादेशला ११ अब्ज डॉलर्सचा फटका बसला असल्याचं अहवालात नमूद करण्यात आलं आहे.

जगात विशेषतः आशियात आलेल्या नैसर्गिक आपत्तीला, संकटांना जागतिक पातळीवर तापमानात झालेली वाढ कारणीभूत असल्याचं जागतिक हवामान संस्थेने स्पष्ट केलं आहे. हरितगृह वायूचे वाढलेले प्रमाण कारणीभूत ठरलं आहे. २०२० मध्ये जगात टाळेबंदी होती, करोना महामारी होती. असं असतांना देखील हरितगृह वायूचे प्रमाण वाढल्याचं अहवालात सांगितलं आहे. यामुळे गेल्या ४० वर्षातील सर्वात जास्त सरासरी तापमान राहिलेलं वर्ष म्हणून २०२० या वर्षाची ओळख झाल्याचं या अहवालात म्हंटलं आहे.

संयुक्त राष्ट्राची ‘जागतिक हवामान बदल’ याबाबतची एक मोठी परिषद स्कॉटलंड इथल्या ग्लासगो इथे पुढील आठवड्यात होत आहे. जागतिक पातळीवरच्या हवामान बदलाबाबत साधकबाधक चर्चा या परिषदमध्ये होणार आहे, हवामान बदलाबाबत नवीन लक्ष्य निश्चित केले जाण्याची शक्यता आहे. या परिषदला जेमतेम एक आठवडा असतांना जागतिक हवामान संस्थेने २०२० चा अहवाल प्रसिद्ध केला आहे हे विशेष.