एखाद्या विषयाचा अभ्यास करण्यासाठी किंवा विशिष्ट गोष्टींचा संदर्भ जाणून घेण्यासाठी वाचनालयातील पुस्तकांचा वापर आपल्यापैकी अनेकांनी केला असेल. परंतु, कितीही म्हटले तरी पुस्तक अथवा इंटरनेटवरवरून मिळवलेल्या माहितीच्या आधारे व्यक्ती किंवा एखादी संकल्पना जाणून घेण्यास मर्यादा येतात. मात्र, तुम्हाला हवी असलेली विशिष्ट माहिती तशाच प्रकारच्या परिस्थितीतून गेलेल्या एखाद्या व्यक्तीने तुम्हाला दिली तर निश्चितच तुम्हाला मदत होईल. यासाठीच डेन्मार्कच्या कोपनहेगनमध्ये विशिष्ट घटनांचा अनुभव असणाऱ्या माणसांची लायब्ररी सुरू करण्यात आली आहे. स्वत:च्या अभ्यासासाठी या संग्रहालयातून तुम्ही पुस्तकांप्रमाणे एखादा माणूस सोबत घेऊ शकता. रोनी अॅब्रेगल यांच्या संकल्पनेतून २००० साली ‘द ह्युमन लायब्ररी’ची मुहूर्तमेढ रोवली गेली. सुरूवातीला त्यांनी कोपनहेगनमधील रॉस्कील्ड फेस्टिव्हलमध्ये ही संकल्पना कितपत यशस्वी ठरेल, याची चाचपणी करून पाहिली. फेस्टिव्हलमध्ये या संकल्पनेला मिळालेला तुफान प्रतिसाद पाहता रोनी अॅब्रेगल यांनी कायमस्वरूपी ह्युमन लायब्ररी तयार करण्याचा निर्णय घेतला.समजा तुम्हाला ऑटिझमबद्दल अथवा सिरियातील बंडखोरांबद्दल माहिती हवी असेल तर तुम्ही या लायब्ररीतून ऑटिझमग्रस्त रूग्ण किंवा बंडखोर व्यक्ती पुस्तकांप्रमाणे घेऊन जाऊ शकता. त्यांच्याशी बोलून किंवा त्यांना प्रश्न विचारून तुम्ही संबंधित विषयाची माहिती जाणून घेऊ शकता. गेल्या १६ वर्षात अमेरिका, पोलंड, कॅनडा, युक्रेनसह ७० देशांमध्ये या मानवी लायब्ररीच्या शाखा सुरू करण्यात आल्या आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 26th Feb 2016 रोजी प्रकाशित
विषय समजून घेण्यासाठी किंवा संदर्भासाठी आली ह्युमन लायब्ररी!
डेन्मार्कच्या कोपनहेगनमध्ये विशिष्ट घटनांचा अनुभव असणाऱ्या माणसांची लायब्ररी सुरू करण्यात आली आहे
Written by लोकसत्ता टीम

First published on: 26-02-2016 at 16:10 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Would you like to borrow a human being like you do books there is an actual library for that