कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरला असून भाजपाला मिळालेल्या या घवघवीत यशामध्ये बी.एस.येडियुरप्पा आणि बी. श्रीरामलु या दोन नेत्यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे. २०१३ सालच्या विधानसभा निवडणुकीत याच दोन नेत्यांनी भाजपाची सर्व समीकरण बिघडवून टाकली होती. लिंगायत समाजाचे मोठे नेते असलेले येडियुरप्पा आणि आदिवासी समाजाचे नेते बी. श्रीरामलु यांनी २०१३ ची विधानसभा निवडणूक स्वतंत्रपणे लढवली होती. त्यावेळी हे दोन्ही नेते भाजपामध्ये नव्हते.

भाजपाला त्या निवडणुकीत या दोन नेत्यांमुळे मोठा फटका बसला होता असे धारवाड येथील कर्नाटक विद्यापीठातील पॉलिटिकल सायन्स विषयाचे प्राध्यापक हरीश रामास्वामी यांनी सांगितले. २०१४ मध्ये या दोन्ही नेत्यांनी पुन्हा भाजपामध्ये प्रवेश केला व कर्नाटकातून खासदार झाले. २०१३ मध्ये येडियुरप्पा यांनी स्थापन केलेल्या कर्नाटक जनता पक्षाने ९.८ टक्के मते घेत सहा जागा जिंकल्या होत्या.

श्रीरामलु यांच्या बादावारा श्रमिकारा रायतारा काँग्रेसने २.७ टक्के मते मिळवित चार जागा जिंकल्या होत्या. त्यावेळी भाजपाला फक्त २० टक्के मते मिळवत ४० जागांवर समाधान मानावे लागले होते. भाजपा त्या निवडणुकीत ६८ जागा जिंकू शकली असती. पण येडियुरप्पा, श्रीरामलु सोबत नसल्याने त्यावेळी २८ जागांचा फटका बसला होता.

केजेपीच्या सहा जागा आणि बीएसआर काँग्रेसच्या चार जागा मिळून भाजपाला ७८ जागापर्यंत पोहोचता आले असता. येडियुरप्पा आणि श्रीरामलु यांची पकड असलेल्या उत्तर कर्नाटकात भाजपाने चांगली कामगिरी केली आहे. उत्तर कर्नाटकात लिंगायत मतदारांचा मोठा प्रभाव आहे. या निवडणुकीत भाजपाने किनारपट्टी भागात आणि मुस्लिम बहुल क्षेत्रातही बऱ्यापैकी यश मिळवले आहे.