उत्तर प्रदेशचे नवनियुक्त मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्यांच्या सरकारी बंगल्यात विधिपूर्वक प्रवेश करण्यापूर्वी भगव्या वस्त्रधारी अनेक साधूंनी त्यांचा ‘पवित्र प्रवेश’ निश्चित करण्यासाठी सोमवारी या बंगल्याचा परिसर ‘शुद्ध’ करण्याची पूर्ण तयारी केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गोरखपूरचे पाच वेळा खासदार राहिलेले आणि गोरखनाथ पीठाचे महंत असलेले आदित्यनाथ यांनी रविवारी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. विधिपूर्वक प्रार्थना आणि शुद्धीकरण झाल्याशिवाय आपल्या बंगल्यात प्रवेश न करण्याचे त्यांनी ठरवले आहे.

कडव्या हिंदुत्ववादाचे प्रतीक मानले जाणारे योगी आदित्यनाथ हे शुभमुहूर्तावरच या परिसरात प्रवेश करण्याची अपेक्षा आहे.गोरखपूर व अलाहाबाद येथील सात साधूंनी मुख्यमंत्र्यांच्या सरकारी बंगल्याच्या प्रवेशद्वाराजवळ प्रार्थना केली. एका साधूने मुख्यमंत्र्यांच्या नामफलकावर चंदन व हळदीच्या लेपात बुडवलेल्या झेंडूच्या फुलाने ‘स्वस्तिक’ चिन्ह काढले. हिंदू परंपरेनुसार गृहप्रवेशाच्या प्रसंगी या चिन्हाचे विशेष महत्त्व आहे. या साधूने बंगल्याच्या दारांवर ‘ओम’ व ‘शुभ-लाभ’ ही अक्षरेही काढली.

गृहप्रवेशाच्या वेळी लक्ष्मी व श्रीगणेशाची पूजा करण्याची ही नेहमीची प्रथा आहे, असे एका साधूने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितले.बंगल्याच्या आतील भागात साधूंनी यज्ञ आणि हवन करण्यासाठी पुरेपूर तयारी केली आहे.

सरकारी अधिकाऱ्यांनाहीमालमत्ता जाहीर करण्याचा आदेश

भ्रष्टाचाराविरुद्ध आघाडी उघडण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून उत्तर प्रदेश सरकारच्या अधिकाऱ्यांनी १५ दिवसांमध्ये त्यांची मालमत्ता जाहीर करावी, असा आदेश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिला आहे. आदल्या दिवशी त्यांनी त्यांच्या सहकारी मंत्र्यांनाही असाच आदेश दिला होता.

लोकभवन येथे वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत पहिल्यांदा संवाद साधताना मुख्यमंत्र्यांनी त्यांना भाजपच्या ‘संकल्प पत्राची’ (जाहीरनामा) अंमलबजावणी निश्चित करण्याच्या सूचना दिल्या.

ही उत्तर प्रदेश सरकारच्या अधिकाऱ्यांसोबतची परिचय बैठक होती. संकल्प पत्राची अंमलबजावणी करण्याबाबत या वेळी अधिकाऱ्यांना सांगण्यात आले.

याशिवाय मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना १५ दिवसांच्या आत त्यांची स्थावर व जंगम मालमत्ता जाहीर करण्यास सांगितले, अशी माहिती उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य यांनी पत्रकारांना दिली.

 

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Yogi adityanath bjp uttar pradesh cm
First published on: 21-03-2017 at 00:46 IST