उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधकांवर सडकून टीका केलीय. आम्ही करोना काळात जनतेची सेवा करत असताना इतर पक्षांचे लोक गृहविलगीकरणात होते असा आरोप आदित्यनाथ यांनी केला. तसेच तुमच्या संकटाच्यावेळी घरात घुसून बसलेल्या आणि केवळ ट्विटरवर दिसणाऱ्या नेत्यांना मतं देखील ट्विटरच देईल असं सांगा, असं आवाहन आदित्यनाथ यांनी केलं. ते उत्तर प्रदेशमधील इटवाह येथील एका सभेत बोलत होते.

योगी आदित्यनाथ म्हणाले, “करोना काळात देखील मी तुमच्या जिल्ह्यात दोन दोन वेळा आलो होतो. व्यवस्था पाहण्यासाठी आमचे दोन्ही आमदार, खासदार स्थानिक प्रशासनासोबत, आरोग्य विभाग, करोना योद्ध्यांसोबत जनतेची सेवा करत होते. मात्र, इतर पक्षांचे लोक गृहविलगीकरणात होते. जे तुमच्यावरील संकटाच्यावेळी घरात घुसून बसेल त्यांना निवडणुकीत देखील घरातच बसवा.”

“जे तुमच्या संकटात उभे राहू शकत नाही, तुमच्या दुःखात सहभागी होऊ शकत नाही त्यांना वेळ आल्यावर तशाचप्रकारे उत्तर देण्याची गरज आहे. जसे हे लोक तुमच्यावरील संकटाच्या काळात घरात होते, ट्विटरवरच होते, त्यांना मतं देखील ट्विटरच देईल असं सांगा,” असंही योगी आदित्यनाथ यांनी सांगितलं. यावर सभेला उपस्थितांनी टाळ्या वाजवत दाद दिली.

उत्तर प्रदेशमध्ये नदीत मृतदेह वाहताना दिसल्यानं जोरदार टीका

योगी आदित्यनाथ यांनी करोना काळात परिस्थिती व्यवस्थित हाताळल्याचा दावा केला असला तरी प्रत्यक्षात उत्तर प्रदेशमधील स्थिती वेगळी दिसली होती. उत्तर प्रदेशमध्ये अनेक मृतदेह नदीत वाहताना दिसल्यानं आणि नदी किनारी गाडलेले अनेक मृतदेहांचे फोटो जागतिक पातळीवर चर्चेचा विषय ठरले होते. तसेच हे उत्तर प्रदेश सरकारचं करोना परिस्थिती हाताळण्यातील अपयश असल्याचीही टीका झाली होती.

हेही वाचा : करोनाबाधितांची आकडेवारी लपवण्यात उत्तर प्रदेश, बिहार आघाडीवर; अमेरिकन विद्यापिठाचा दावा

करोना वैद्यकीय सामान खरेदीमध्ये योगी सरकारचा करोडोंचा घोटाळा, आपचा गंभीर आरोप

आम आदमी पार्टीचे प्रमुख प्रवक्ते सौरभ भरद्वाज यांनी उत्तर प्रदेशमध्ये करोनाच्या नावाखाली मोठा आर्थिक घोटाळा झाल्याचा आरोप केला होता. सौरभ यांनी केलेल्या दाव्यानुसार वैद्यकीय सामान खरेदीमध्ये उत्तर प्रदेशमध्ये मोठा घोटाळा झाल्याचे म्हटले. थरर्मोमीटर, ऑक्सिमीटरसारख्या करोना कालावधीमध्ये अत्यावश्यक असणाऱ्या वैद्यकीय उपकरणांच्या किमती ३०० ते ५०० टक्क्यांनी वाढवण्यात आल्या. राज्यातील ६५ जिल्ह्यांमध्ये या वैद्यकीय गोष्टी चढ्या दरात विकल्या गेल्याचा आरोप सौरभ यांनी केला होता.

“उत्तर प्रदेशमध्ये सत्तेत असणाऱ्या भाजपा सरकारने एक आदेश जारी केला. त्यानुसार राज्यातील प्रत्येक पंचायतीला राज्य सरकारकडून करोना कीट देण्यात येईल असं सांगण्यात आलं. यामध्ये एक ऑक्सिमीटर, एक इन्फ्रारेड थर्मोमीटर, ५०० मास्क, पाच लीटर सॅनिटायझर या गोष्टींचा समावेश होता. एका कीटची किंमत अंदाज २७०० ते २८०० रुपये इतकी होती. मात्र या कीटमधील सर्व गोष्टी दोन हजार रुपयांच्या आत उपलब्ध करुन देणं सहज शक्य होतं,” असं सौरभ यांनी म्हटलं आहे. “मात्र दुर्देवाने उत्तर प्रदेशमधील अनेक ठिकाणी यामध्ये भ्रष्टाचार झाला. थर्मोमीटर्स आणि ऑक्सिमिटर्सच्या किंमती ५०० ते ३०० टक्क्यांनी वाढवण्यात आल्या,” असं सौरभ यांनी म्हटलं होतं.