उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आणखी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. उत्तर प्रदेश सरकारच्या मंत्रिमंडळाची मंगळवारी बैठक झाली. यावेळी योगी आदित्यनाथ यांनी आग्रा विमानतळाचे नाव बदलण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार आग्रा विमानतळाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते दिनदयाळ उपाध्याय यांचे नाव देण्यात येईल. याशिवाय, गोरखपूरच्या हवाई तळावर उभारण्यात येणाऱ्या नागरी टर्मिनलला नाथपंथाचे संस्थापक गोरखनाथ यांचे नाव देण्यात येईल, अशी माहिती उर्जामंत्री श्रीकांत शर्मा यांनी पत्रकारांना दिली. विशेष म्हणजे योगी आदित्यनाथ हे देशातील नाथपंथीयांच्या महत्त्वाच्या केंद्रापैकी एक असणाऱ्या गोरखनाथ मठाचे महंत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदाची सूत्रे हाती घेतल्यापासून धडाकेबाज निर्णय घेण्याचा सपाटा लावला आहे. उत्तर प्रदेशातील अवैध कत्तलखान्यांवर बंदी घालणे, महिलांच्या सुरक्षेसाठी पोलिसांना अँटी-रोमिओ पथक स्थापन अशा निर्णयांचा यामध्ये समावेश आहे. दरम्यान, योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर येथील सरकारी कार्यालयांतील चित्र मोठ्याप्रमाणावर पालटायला सुरूवात झाली आहे. योगी आदित्यनथांनी काही दिवसांपूर्वी राज्य सरकारच्या कार्यालयांमध्ये पान मसाला, गुटखा आणि तंबाखुच्या सेवनावर बंदी घातली होती. त्यामुळे सरकारी अधिकाऱ्यांची चांगलीच गोची झाली आहे. पान आणि गुटख्याची तल्लफ भागविण्यासाठी या अधिकाऱ्यांवर च्युईंगम आणि गोळ्या चघळाव्या लागत आहेत. याशिवाय, सर्व अधिकारी वेळेवर येऊ लागल्यामुळे मंत्रालयाच्या परिसरात पार्किंगसाठी जागा मिळणेही मुश्किल होऊन बसले आहे. एकुणच सरकारी अधिकाऱ्यांनी योगी आदित्यनाथ यांच्या कार्यपद्धतीचा धसका घेतला आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Yogi adityanath government to rename agra airport after rss ideologue deen dayal upadhyaya
First published on: 18-04-2017 at 22:00 IST