उत्तर प्रदेशमध्ये अभूतपूर्व मताधिक्याने जिंकल्यानंतर योगी आदित्यनाथ यांची मुख्यमंत्री म्हणून निवड करण्यात आली. त्यानंतर त्यांनी पदभार स्वीकारला. आज प्रथमच योगी आदित्यनाथ यांनी विधानसभेला संबोधित केले. ऐन दुपारची वेळ असल्यामुळे म्हणा किंवा उत्तर प्रदेशच्या निवडणुकांच्यावेळी घेतलेली मेहनत म्हणा यामुळे भारतीय जनता पक्षाच्या आमदारांना थकवा आला आणि योगी आदित्यनाथ यांच्या भाषणादरम्यान त्यांनी झोपा काढल्या. इंडियन एक्सप्रेसचे फोटो जर्नलिस्ट विशाल श्रीवास्तव यांनी त्यांना आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद केले आहे. ३२५ पेक्षा अधिक आमदार असलेल्या भाजपची विधानसभेत वेगळ्याच कारणाने चर्चा रंगली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ज्या प्रमाणे समोरच्या बेंचवरील विद्यार्थी शिक्षकांचे म्हणणे लक्ष देऊन ऐकतात त्याप्रमाणे आदित्यनाथ यांच्यापासून जवळ बसलेले कॅबिनेट मंत्री हे त्यांचे भाषण लक्षपूर्वक ऐकत होते. परंतु जे पाठीमागे बसलेले आमदार होते त्यांना झोप अनावर झाली आणि त्यांनी झोप काढली देखील.

नुकताच झालेल्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला प्रचंड बहुमत मिळाले. ४०३ जागांपैकी भारतीय जनता पक्षाला ३२५ ठिकाणी विजयश्री मिळाला. आपल्याला बहुमत मिळाले आहे. जनतेचा कौल मिळाला आहे. त्याची जबाबदारी ही खूप मोठी आहे असे योगी आदित्यनाथ यांनी वारंवार सांगितले आहे.

जनतेशी एकरूप व्हा. त्यांच्या काळजी घ्या. त्यांच्या सतत संपर्कात राहा अशा सूचना आदित्यनाथ यांनी वारंवार केल्या आहेत. परंतु आदित्यनाथांचे भाषण सुरू असतानाच झोपेवर नियंत्रण न राहिल्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या आमदारांनी पहिल्याच भाषणादरम्यान झोपा काढल्यामुळे चर्चेला उधाण आले आहे. सोशल मिडियावर देखील हे फोटो चर्चेत आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Yogi adityanath mla sleep during speech
First published on: 30-03-2017 at 19:06 IST