Donald Trump अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इजिप्तमध्ये आयोजित करण्यात आलेल्या शिखर परिषदेत जगातल्या नेत्यांना संबोधित केलं. त्यावेळी त्यांनी अचानक इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांची स्तुती करण्यास सुरुवात केली. ज्यामुळे सगळ्यांनाच आश्चर्य वाटलं. जॉर्जिया मेलोनी यांना डोनाल्ड ट्रम्प ब्युटिफुल वुमन असं म्हणाले. त्यांनी केलेलं हे विधान चर्चेत आलं आहे.

आधी एर्दोगन यांच्याकडून मेलोनी यांची स्तुती

एकीकडे इजिप्तमध्येच तुर्कियेचे राष्ट्राध्यक्ष एर्दोगन यांनी मेलोनी यांची स्तुती केली. तुम्ही सुंदर दिसता पण तुम्ही धूम्रपान सोडलं पाहिजे असं एर्दोगन म्हणाले. ज्यापाठोपाठ आता डोनाल्ड ट्रम्प यांनीही मेलोनी यांना सुंदर महिला असं म्हणत त्यांची स्तुती केली आहे. डोनाल्ड ट्रम्प बोलत असताना मेलोनी या त्यांच्या मागेच उभ्या होत्या. डोनाल्ड ट्रम्प यांचे ब्युटीफुल वुमन हे उद्गार ऐकल्यानंतर मेलोनी यांनी स्मित हास्य केलं.

इजिप्तच्या संमेलनात २५ हून अधिक देशांचे नेते

इजिप्तच्या संमेलनात २५ हून अधिक देशांचे नेत सहभागी झाले आहेत. मेलोनी या सगळ्यांमध्ये एकमेव महिला नेत्या आहेत. मंचावर डोनाल्ड ट्रम्प बोलत असताना जॉर्जिया मेलोनी या त्यांच्या मागे उभ्या होत्या. ३० नेत्यांमध्ये मेलोनी एकमेव महिला नेत्या होत्या. डोनाल्ड ट्रम्प यांनी नेमकं काय म्हटलं जाणून घेऊ.

डोनाल्ड ट्रम्प नेमकं काय म्हणाले?

डोनाल्ड ट्रम्प भाषण करत होते, तेवढ्यात ते म्हणाले, मला हे म्हणायची संमती आहे की नाही माहीत नाही. जर अमेरिकेत तुम्ही हे म्हणालात तर तुमचं राजकीय करिअर संपतं. तरीही मी रिस्क घेतो आहे आणि म्हणतो आहे जॉर्जिया मेलोनी या सुंदर महिला आहेत. जर अमेरिकेत तुम्ही असं काही वक्तव्य केलंत तर तुमचं राजकीय करिअर खरोखर संपतं पण मी रिस्क घ्यायला तयार आहे. असंही डोनाल्ड ट्रम्प म्हणाले.

तुम्ही सुंदर आहात खरंच-डोनाल्ड ट्रम्प

डोनाल्ड ट्रम्प हे त्यांच्या भाषणात मेलोनींनी उद्देशून असंही म्हणाले की मी तुम्हाला सुंदर म्हणतो आहे आशा आहे की तुम्हाला काही आक्षेप नसेल. कारण तुम्ही खरंच सुंदर आहात. डोनाल्ड ट्रम्प यांचं हे वाक्य ऐकून मेलोनी मंद स्मित करताना दिसल्या. दरम्यान जेव्हा मेलोनी यांची स्तुती डोनाल्ड ट्रम्प यांनी केली. इटलीमध्ये त्यांचा सन्मान ठेवला जातो आणि त्या एक यशस्वी पंतप्रधान आहेत असंही डोनाल्ड ट्रम्प म्हणाले.