Governor Anandiben Patel Remark: उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल यांनी लिव्ह-इन रिलेशनशिपचा विरोध करत असताना पुन्हा एकदा वाद निर्माण करणारे विधान केले आहे. विद्यापीठातील विद्यार्थीनींशी बोलत असताना त्यांनी म्हटले की, तुम्ही अशा नात्यापासून दूर राहावे, अन्यथा तुमचे ५० तुकडे होतील. दोन दिवसांपूर्वी त्यांनी म्हटले होते की, एका अनाथ आश्रमाला त्यांनी भेट दिली असता तिथे लिव्ह-इन रिलेशनशिपचे दुष्परिणाम दिसून आले होते. १५ वर्षांच्या मुलीच्या हातात तिचे तान्हे बाळ होते. तसेच इतरही अनेक मुली गर्भवती होत्या.

वाराणसीमधील महात्मा गांधी काशी विद्यापीठाच्या ४७ व्या दीक्षांत समारंभात बोलत असताना त्यांनी विद्यार्थीनींना लिव्ह-इन रिलेशनशिपपासून दूर राहण्याचा सल्ला दिला. महिलांवरील वाढत्या हिंसाचाराच्या घटनांबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली आणि महिला व विद्यार्थ्यांना त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात सुज्ञपणे निर्णय घेण्याचे आवाहनही केले.

राज्यपाल आनंदीबेन पटेल म्हणाल्या की, विद्यार्थीनींना मी सांगू इच्छिते की, लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये नका पडू, नका पडू. स्वतःच्या जीवनात निर्णय घेताना सावधगिरी बाळगा. तुमच्या आजूबाजूला बघा, असा निर्णय घेणाऱ्यांचे ५०-५० तुकडे होत आहेत. मागच्या काही काळात अशा घटना समोर आल्या आहेत. या घटना ऐकल्यानंतर चिंता वाटते. आमच्या मुली असा निर्णय का घेत असतील? हा प्रश्न पडतो.

मागच्या १० दिवसांत काही बातम्या कानावर आल्या. त्या ऐकून मला दुःख वाटले. मुलींनी आपल्या भवितव्याचा विचार करून सांभाळून निर्णय घ्यावा, अशी माझी सूचना असल्याचेही राज्यपाल पटेल म्हणाल्या.

पोक्सो कायद्याचा संदर्भ देताना राज्यपाल पटेल म्हणाल्या की, त्यांनी काही पीडित मुलींची वैयक्तिकरित्या भेट घेतली. त्यांच्याशी संवाद साधल्यानंतर प्रत्येक मुलीची कहाणी अस्वस्थ करणारी होती, असे त्या म्हणाल्या. यानंतर त्यांनी एका न्यायाधीशांशी याबाबत चर्चा केली. त्यांनीच विद्यापीठांमध्ये आणि महाविद्यालयात विद्यार्थीनींमध्ये जागरूकता निर्माण करण्याची सूचना दिल्याचेही राज्यपाल म्हणाल्या.

पाहा व्हिडीओ

मंगळवारी (७ ऑक्टोबर) बलिया येे जननायक चंद्रशेखर विद्यापीठाच्या ७ व्या दीक्षांत समारंभात बोलत असताना राज्यपाल आनंदीबेन पटेल यांनी अशाच प्रकारचे विधान केले होते. त्या म्हणाल्या की, तुम्हाला लिव्ह-इनचे दुष्परिणाम पाहायचे असतील तर अनाथ आश्रमाला भेट द्या. तिथे १५ ते २० वर्षांच्या मुली हातात वर्षभराचे बाळ घेऊन रांगेत उभ्या आहेत.

लिव्ह-इनचा कडाडून विरोध करत असताना राज्यपाल आनंदीबेन पटेल म्हणाल्या, ते (पुरुष) तरूणींना फसवून हॉटेलमध्ये घेऊन जातात. त्यांच्याशी संबंध ठेवतात आणि मुल राहिल्यानंतर मुलींना सोडून देतात. ही आपली संस्कृती नाही. तरीही हे घडत आहे. मुलींनी आपले आयुष्य एखाद्या उदात्त ध्येयासाठी समर्पित करावे, असाही सल्ला त्यांनी दिला.