पीटीआय, नवी दिल्ली

बेहिशेबी रोख रक्कम प्रकरणाच्या अंतर्गत चौकशीला आव्हान देणारी अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांची याचिका सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी फेटाळून लावली. तुमचे वर्तन प्रेरणादायी नाही, अशा शब्दांत न्यायालयाने न्या. वर्मा यांना फटकारले.

न्या. यशवंत वर्मा यांच्या याचिकेवर सुनावणी करणाऱ्या न्यायमूर्ती दीपंकर दत्ता आणि ए. जी. मसीह यांच्या खंडपीठाने म्हटले की, या प्रक्रियेला कायदेशीर मान्यता आहे. न्या. वर्मा यांचे वर्तन योग्य नव्हते. त्यांची याचिका विचारात घेतली जाऊ नये.

मार्चमध्ये दिल्लीतील अधिकृत निवासस्थानी आग लागल्यानंतर अर्ध्या जळालेल्या रोख रकमेचा मोठा साठा सापडल्यापासून वादाच्या केंद्रस्थानी असलेल्या न्यायाधीशांसाठी हा मोठा धक्का आहे. न्यायाधीश वर्मा यांनी ८ मे रोजी तत्कालीन सरन्यायाधीशांकडे संसदेला त्यांच्याविरुद्ध महाभियोगाची प्रक्रिया सुरू करण्याची शिफारस रद्द करण्याची मागणी केली होती.सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की तत्कालीन सरन्यायाधीश आणि अंतर्गत समितीने व्हिडीओ फुटेज आणि छायाचित्रे अपलोड करण्याव्यतिरिक्त प्रक्रिया काटेकोरपणे पाळली आहे.