संशयातून झालेल्या गोळीबारात निरपराध तरुणांचा बळी गेल्यानंतर भारतीय लष्कराकडून त्याची जाहीर कबुली देण्यात आली. गेल्या ३० वर्षांच्या इतिहासात प्रथमच असा प्रकार घडला असून गोळीबार करणाऱ्यांविरोधात सरकारने कठोर भूमिका घेतली आहे. यातूनच माझ्या सरकारच्या हेतूंविषयी तुम्हाला कल्पना येईल, असे उद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढले. काश्मीर खोऱ्यातील पहिल्या प्रचारसभेत ते बोलत होते.
३ नोव्हेंबर रोजी बडगांम जिल्ह्य़ातील चत्तरगाम येथे सैन्याच्या आदेशानंतरही न थांबता पुढे जाणाऱ्या एका वाहनावर भारतीय लष्कराने गोळीबार केला होता. वाहनाने आदेश न पाळल्यामुळे ‘संशय’ आला व त्यातून हा गोळीबार करण्यात आल्याचे सैन्याने पुढे स्पष्टही केले होते. मात्र या गोळीबारात दोन निष्पाप तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर दोन जण जखमी झाले होते.
या घटनेचा संदर्भ पंतप्रधानांनी आपल्या प्रचारात दिला. या दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी एका समितीची स्थापना करण्यात आली. तसेच ज्यांनी हा गोळीबार केला त्यांच्यावर आरोपही निश्चित करण्यात आले. गेल्या ३० वर्षांच्या इतिहासात असे प्रथमच घडते आहे, यातून तुम्हाला माझ्या सरकारच्या न्याय्यतेबाबत कल्पना आली असेल, अशी आशा मोदी यांनी व्यक्त केली.

पंतप्रधान म्हणतात..
* आपले लेकरू आईसाठी अमूल्य असते. अशा बाळाच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबाचे मूल्य अनमोल असते. त्यामुळे एखाद्या मुलाचा जीव गेल्यास त्याच्या आईइतकीच वेदना देशालाही होत असते .
* जवानांनी आणि पोलिसांनी हौतात्म्य पत्करलेच, पण त्याचबरोबर निष्पाप मुलांनाही आपले प्राण गमवावे लागले. हे देशाचे कधीही न भरून येणारे नुकसान आहे.
* तुमचे दु:ख हेच माझे दु:ख, तुमच्या वेदना या माझ्याही वेदनाच.