Bail Application of YouTuber Jyoti Malhotra, Who Spied For Pakistan, Rejected: हेरगिरीच्या संशयावरून मे महिन्यात अटक करण्यात आलेल्या युट्यूबर ज्योती मल्होत्राचा जामीन अर्ज हरियाणाच्या हिसार जिल्ह्यातील न्यायालयाने फेटाळून लावला आहे आणि म्हटले आहे की, जामिनावर सुटका केल्याने तपासात अडथळा येऊ शकतो अशी भीती आहे.

हिसार पोलिसांनी ‘ट्रॅव्हल विथ जेओ’ हे युट्यूब चॅनल चालवणाऱ्या ज्योती मल्होत्राला १६ मे रोजी अटक केली होती. मल्होत्रा ​​सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश डॉ. परमिंदर कौर यांच्या न्यायालयाने त्यांच्या सविस्तर आदेशात ज्योती मल्होत्राचा जामीन अर्ज फेटाळून लावला.

पुरावे अशी भीती निर्माण करतात की…

“ऑफिशियल सिक्रेट्स अॅक्ट आणि भारतीय न्याय संहितेच्या तरतुदींनुसार हे गंभीर प्रकरण आहे. आरोपीच्या इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसमधून जप्त केलेला फॉरेन्सिक कंटेंट, मल्टी एजन्सी सेंटर गुप्तचर माहिती आणि परदेशी अधिकाऱ्याशी संपर्कांचे परिस्थितीजन्य पुरावे अशी भीती निर्माण करतात की, ज्योती मल्होत्राची जामिनावर सुटका झाल्यास ती तपासात अडथळा आणू शकते किंवा डिजिटल पुराव्यांशी छेडछाड करू शकते”, असे २३ ऑक्टोबरच्या न्यायालयाच्या आदेशात म्हटले आहे.

न्यायालयाने आदेशात पुढे असे निरीक्षण नोंदवले की, “जर सार्वजनिक सुव्यवस्था, सुरक्षेला धोका असेल किंवा त्यामुळे आरोपी तपास प्रक्रियेत अडथळा निर्माण करू शकत असेल तर जामीन मंजूर केला जाऊ नये हे न्यायालयांनी लक्षात घेतले पाहिजे.”

गुप्तचर यंत्रणेने ज्या माहितीच्या आधारे आरोप केले आहेत, ती माहिती तपासली गेली नाही. तसेच परदेशी एजंट्सना संवेदनशील माहिती पुरवल्याचा थेट पुरावा सादर करण्यात सरकारी पक्ष अपयशी ठरला आहे. ज्योती मल्होत्राच्या वकिलांच्या या युक्तिवादावर न्यायालयाने म्हटले की, अशा बाबींची शेवटी खटल्यात चाचणी घेतली पाहिजे आणि आरोपीला आरोपांना आव्हान देण्याचा अधिकार आहे.

जामिनाचा विचार करताना न्यायालयाने त्या टप्प्यावर उपलब्ध असलेल्या पुराव्यांची सत्यता पाहिली पाहिजे, असेही न्यायालयाच्या आदेशात म्हटले आहे.

हेरगिरीच्या आरोपाखाली अनेकांना अटक

पोलिसांनी यापूर्वी दिलेल्या माहितीनुसार, ज्योती मल्होत्रा ​​नोव्हेंबर २०२३ पासून पाकिस्तानी उच्चायोगातील कर्मचारी एहसान-उर-रहीम उर्फ ​​दानिशच्या संपर्कात होती. भारताने १३ मे रोजी हेरगिरीच्या आरोपाखाली दानिशला हद्दपार केले होते.

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तान विरोधात कठोर भूमिका घेत ऑपरेशन सिंदूर राबवले होते. या दरम्यान तपास यंत्रणांनी ज्योती मल्होत्रासह अनेकांना हेरगिरीच्या आरोपाखाली अटक केली होती.