Leela Sahu Viral Video News: गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर Youtuber लीला साहूची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. भाजपा खासदार डॉ. राजेश मिश्रा यांनी लीला साहूबाबत केलेल्या वादग्रस्त विधानामुळे तिने मांडलेल्या मुद्द्यांना व्यापक समर्थन मिळू लागलं होतं. अखेर तिच्या शर्थीच्या प्रयत्नांसमोर प्रशासनाला झुकावंच लागल्याचं स्पष्ट झालं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून गावातल्या रस्त्यासाठी भांडणाऱ्या लीला साहूच्या प्रयत्नांना यश आलं असून रस्तादुरुस्तीला मुहूर्त लागला आहे. यासंदर्भात इंडियन एक्स्प्रेसनं सविस्तर वृत्त दिलं आहे.

कोण आहे लीला साहू?

२२ वर्षांची लीला साहू मध्य प्रदेशच्या सिधी जिल्ह्यातल्या एका छोट्या गावात राहते. तीन वर्षांपूर्वी म्हणजेच २०२२ मध्ये लीलानं तिचं यूट्यूब चॅनल सुरू केलं. स्थानिक पातळीवरचे मुद्दे तिने यातून मांडण्यास सुरुवात केली. गावातली संस्कृती, दैनंदिन आयुष्य यासंदर्भात प्रामुख्याने ती व्हिडीओ करते. सध्या तिचे २३ लाखाहून जास्त फॉलोअर्स आहेत. तिच्या याच यूट्यूब चॅनलवरून लीला साहूनं तिच्या गावातली रस्त्याची समस्या मांडली आणि गदारोळाला सुरुवात झाली.

लीला साहू गर्भवती असून आपल्या उपचारांसाठी किंवा गावातील इतर नागरिकांना या रस्त्याने ये-जा करणं अशक्य झाल्याची व्यथा तिने मांडली. गावातल्या, आसपासच्या अनेक पुढाऱ्यांना ती भेटली. पण कुणीही रस्त्याचं काम करायला तयार नव्हतं. शेवटी तिने व्हिडीओच्या माध्यमातून थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व सिधीचे भाजपा खासदार राजेश मिश्रा यांनाच प्रश्न विचारले.

राजेश मिश्रांचं ‘ते’ विधान आणि वाद!

दरम्यान, खासदार राजेश मिश्रांनी लीला साहूबाबत केलेल्या विधानामुळे चर्चा आणखीनच वाढली. “महिलांच्या प्रसूतीच्या तारखेचा अंदाज आधीच वर्तवलेला असतो, त्यामुळे आम्ही एक आठवडाआधीच त्यांना वाहतुकीची व्यवस्था उपलब्ध करून देऊ. तिने तारीख सांगावी आम्ही एक आठवडाआधीच तिला उचलू आणि इथे रुग्णालयात आणू”, असं राजेश मिश्रा माध्यांना म्हणाले.

राजेश मिश्रा यांच्या या विधानावरून वाद निर्माण झाल्यानंतर आपल्या विधानाचा विपर्यास करण्यात आल्याचं स्पष्टीकरण त्यांनी दिलं. तसेच, येत्या १७ महिन्यांन लीला साहूच्या गावातला रस्ता बांधून तयार असेल, असं आश्वासनही दिलं.

आश्वासन भाजपाचं, रस्त्यासाठी पुढाकार काँग्रेसचा!

दरम्यान, आता काँग्रेस आमदारांच्या पुढाकाराने लीला साहूच्या गावातल्या रस्त्याच्या दुरुस्तीचं काम हाती घेण्यात आल्याचं समोर आलं आहे. खुद्द लीला साहूनं ही माहिती दिली आहे. “आज काही लोक आले आणि त्यांनी माझ्या गावाजवळ बांधकाम सुरू केलं आहे. मला कळलं की स्थानिक काँग्रेस आमदार अजय सिंह राहुल यांनी यासाठी पुढाकार घेतला होता. सध्या ते रस्त्याचा सर्वात खराब भाग दुरुस्त करत आहेत, जेणेकरून किमान वाहनांची ये-जा सुरू होईल”, असं लीला साहू म्हणाली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

स्वत:च्या पैशांनी रस्त्याचं काम

काँग्रेस आमदार अजय सिंह राहुल यांनी स्वत:च्या पैशातून रस्त्याचं काम केल्याचं सांगितलं. “मला जेव्हा या महिलेच्या व्यथांबाबत समजलं, तेव्हा मी विचार केला की किमान गाड्यांची ये-जा सुरू होईपर्यंत तरी काही काम व्हायला हवं. गेल्या वर्षभरापासून मी हा रस्ता बांधला जावा यासाठी प्रयत्न करत आहे. पण आमचं कुणीही ऐकलं नाही. त्यामुळे आता मी स्वखर्चाने या रस्त्याचा काही किलोमीटरचा भाग बांधतोय”, असं अजय सिंह राहुल म्हणाले.