प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचा बुधवारी ८५ वा वाढदिवस पार पडला. यानिमित्ताने सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी रतन टाटा यांना दिर्घायुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. यादरम्यान वायएसआर काँग्रेसचे खासदार रघु रामकृष्ण राजू यांनी रतन टाटा यांना भारतरत्न दिला जावा अशी मागणी केली आहे. रघु रामकृष्ण राजू यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्र दिलं आहे.
“अनेक अब्जाधीश या पृथ्वीवर जन्माला येतील, पण ज्यांनी लोकांवर कायमस्वरुपी एक छाप सोडली आहे ते रतन टाटा यांच्यासारखे लोक आहेत,” असं त्यांनी राष्ट्रपतींना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे. “रतत टाटा एक महान व्यक्ती असून, ते भारतरत्नसाठी पात्र आहेत,” असंही त्यांनी म्हटलं आहे.
देशातील परोपकारी अब्जाधीशांच्या यादीत रतन टाटांचा कायम उल्लेख असेल असं त्यांनी म्हटलं असून द्रौपदी मुर्मू यांना भारतरत्न देऊन सन्मानित करण्यासंबंधी सकारात्मक विचार करण्यास सांगितलं आहे.
ऑक्टोबरमध्ये, रतन टाटा यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संलग्न असणाऱ्या सेवा भारतीने ‘सेवा रत्न’ प्रदान केला होता. त्यांच्या निःस्वार्थ समाजसेवेसाठी हा पुरस्कार देण्यात आला होता. रतन टाटा यांच्यासह इतर २५ मान्यवर आणि संस्थांनाही पुरस्कार देण्यात आला होता. रतन टाटा या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नव्हते.