पीटीआय, नवी दिल्ली : ‘‘दिल्लीच्या शासन यंत्रणेचे प्रारूप हे ‘शून्य भ्रष्टाचार प्रारूप’ असून, नागरिकांनी अशी प्रणाली यापूर्वी पाहिली नसेल,’’ असा दावा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सोमवारी केला. ते विधानसभेत बोलत होते. यावेळी विरोधी भाजप आमदारांवर टीका करताना ते म्हणाले, की २०१४ मध्ये केंद्रात सरकार आल्यापासून विश्व अस्तित्वात आले, असेच भाजपच्या आमदारांना वाटते.
राज्य सरकारच्या कामगिरीचा आढावा घेताना केजरीवाल म्हणाले, की दिल्ली पूर्वी राष्ट्रकुल क्रीडा घोटाळा आणि ‘कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस’ घोटाळय़ासाठी बदनाम होती. आता ती उत्कृष्ट शाळा आणि रुग्णालयांसाठी ओळखली जाते. दिल्लीचे प्रारूप हे ‘शून्य भ्रष्टाचार प्रारूप’ आहे. दिल्लीत देशाच्या अन्य भागांच्या तुलनेत सर्वात कमी महागाई आहे. जागतिक दर्जाची आरोग्य व्यवस्था, २४ तास पाणी आणि वीजपुरवठा, स्वच्छ व आधुनिक शहराची निर्मिती या प्रारूपांतर्गत केली जात आहे असे त्यांनी सांगितले.